बुलडाणा - कोरोनाने हाहाकार माजविला असताना दुसरी, तिसरी लाट येणार असल्याचे तज्ञांचे मत आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना जास्त संसर्ग होण्याचेही भाकित तज्ज्ञांनी वर्तविले असताना बुलडाण्यात एक धक्कादायक प्रकार व्हायरल व्हिडिओमुळे समोर आला आहे. जिल्हाधिकारी एस.राममूर्ती यांचा संग्रामपूर तालुक्यात दौरा होता. जिल्हाधिकारी आपल्या शाळेतील कोरोनाबाधितांच्या विलगीकरण सेंटरला भेट देवू शकतात, म्हणून संग्रामपूर तालुक्यातील मारोड या गावातील प्राथमिक शाळेतील विलगीकरण कक्षात 15 कोरोनाबाधित रुग्ण असताना तेथील स्वछतागृहाची एका 8 वर्षाच्या शाळकरी मुलाकडून हाताने साफसफाई करून घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मुलाला साफसफाई करण्यासाठी धमकविण्यात आल्याचेही समोर आले आहे. मुलांकडून साफसफाईचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने या परिसरात प्रशासनाविरोधात संतापाची लाट आहे.
विलगीकरण कक्षाच्या स्वछतागृहांची शाळकरी मुलाकडून हाताने स्वच्छता गटविकास अधिकाऱ्याने दिला होता विलगीकरण कक्षाची साफसफाई करण्याचा आदेश - तिसऱ्या वर्गात शिकणाऱ्या पीडित बालकाची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने मामाच्या घरी राहून हा मुलगा शिकत आहे. मामालाही मजुरी करण्यात मदत करतो. 28 मे रोजी बुलडाणा जिल्हाधिकारी एस.राममूर्ती हे संग्रामपूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकारी हे मारोड या गावातील शाळेतील कोरोना बाधितांच्या विलगीकरण कक्षाला भेट द्यायला येतील या भीतीने पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या आदेशाने तात्काळ येथील विलगीकरण कक्षाची साफसफाई करण्याचा आदेश देण्यात आला होता. गावात कुणीही नसल्याने चक्क प्रशासनाने या बालकाला या विलगीकरण कक्षाच्या स्वच्छतागृहाची साफसफाई करण्यासाठी 50 रुपयांचे आमिष दाखवले होते. बालकाने नकार दिल्यावर त्याला काठीने मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे बालकाने विलगीकरण कक्षात प्रवेश करून अक्षरशः हाताने टॉयलेट साफ केले. यावेळी या विलगीकरण कक्षात 15 कोरोनाबाधित रुग्ण हजर होते. दरम्यान या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही -
व्हायरल झालेल्या धक्कादायक प्रकारमुळे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून आज रविवारी सुटी असल्याने सोमवारी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांना निवेदन देऊन या बाल मजुरीच्या प्रकाराबद्दल दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान हा बालमजुरीचा प्रकार असून यात जिल्हाधिकाऱ्यांसह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नसल्याचे जेष्ठ समाजसेवक भाऊ भोजने यांनी म्हटले आहे.
गटविकास अधिकाऱ्याचे बेजबाबदार उत्तर -
या सर्व किळसवाण्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर संग्रामपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पाटील यांचेशी संपर्क करून घटनेबद्दल विचारणा केली असता. या घटनेबद्दल मला अधिकृत माहिती नसून कशाला आमची सुट्टी खराब करता बातम्या लावून, असे बेजबाबदार उत्तर प्रसार माध्यमांना दिले, तर प्रशासनाचा कुठलाही अधिकारी या घटनेबद्दल बोलण्यास तयार नाही. यामुळे मात्र लहान बालकांमध्ये कोरोना संक्रमण वाढण्यास बुलडाणा जिल्हा प्रशासन खतपाणी तर घालत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.