बुलडाणा : खासदार संजय राऊत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दोघांमध्ये टीका-टिपण्णी सुरूच आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज बुलढाण्यात आले असताना त्यांनी पुन्हा एकदा खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, रोज सकाळी उठून भोंगा वाजवण्यापेक्षा संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना महाराष्ट्राच्या विकासासाठी दोन चांगल्या सूचना केल्या तर बरे होईल, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते बुलढाण्यात माध्यमांशी संवाद साधत होते.
महाराष्ट्राची संस्कृती : पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासापीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी शरद पवारांचे मार्गदर्शन घेतो असे वक्तव्य केले होते. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जर शरद पवारांचे मार्गदर्शन घेत असतील तर ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. जे चांगलं आहे ते सर्वांनी स्वीकारले पाहिजे. शरद पवार यांचा अनुभव दांडगा आहे, जर ते काही त्या सूचना देत असतील तर सत्तेत असणाऱ्यांनी त्या सूचना स्वीकारण्याचे काम आहे, असेही ते म्हणाले.