बुलडाणा - महानुभवपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त अजिंठा रोडवरील गोपाल आश्रमात २५ ते ३१ जानेवारीपर्यंत विविध पारायण, प्रवचनांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच श्री चक्रधर स्वामी श्रीपंचकृष्ण मंदिर कलशारोहन उद्घाटन श्रीमूर्ती स्थापना, अनुसरणा विधी आणि पंचावतारानिमित्त सव्वा कोटी नामस्मरण यज्ञ, सामुहिक श्रीमदभगवद्गती ज्ञानयज्ञ सहस्त्र पारायण आदी कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त बुधवारी ३० जानेवारीला श्रीपंचकृष्ण मंदिराचा कलशारोहन, श्रीमूर्ती स्थापना अनुसरण विधी आणि पंचावतार उपहार महोत्सव आयोजित करण्यात आला. या मूर्ती स्थापनेच्या निमित्ताने शहरातून श्रीकृष्ण मूर्तीची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत हजारो नागरिकांची उपस्थिती होती. ही शोभायात्रा अजिंठा रोडवरील गोपाल आश्रमातून सुरू होऊन धाड नाका, बस स्टँड, संगम चौक, चैतन्यवाडी, सर्क्युलर रोड, चिंचोले चौकमार्गे परत गोपाल आश्रमात समाप्त करण्यात आली. यावेळी श्री चक्रधर स्वामींची जयंती शासनाने साजरी करुन शासकीय सुट्टी देण्याची विनंती अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषद श्री जाळीचादेवचे प्रमुख आचार्य लोणारकरबाबा यांनी केली.