बुलडाणा- खांमगाव येथील टेंभुर्णा शिवारातील कोट्यवधी किंमतीचे १४ प्लॉट असलेल्या भूखंडाला बनावट खरेदी खत तयार करून स्वतःच्या नावावर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खांमगाव शहर पोलिसात बनावट खरेदी तयार करणाऱ्या भू माफिया प्रेम रेसिडेन्सी हॉटेलचे संचालक प्रदीप प्रेमसुखदास राठी याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी राठी सद्या फरार आहे. यामुळे भूखंड माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ज्यांना हे प्लॉट विकले गेले आहेत. त्यांचीही फसवणूक झाल्याने यामध्ये मोठे मासे गळाला लागण्याचे चिन्ह आहे.
बुलडाण्याच्या खामगावात कोट्यावधीचा भूखंड घोटाळा, गुन्हे दाखल खरेदी खताने प्लॉट खरेदी केल्याचे भासविले
खांमगाव येथील प्लॉट खरेदी-विक्री व्यावसायिक लवकेश सोनी यांचा २००७ मध्ये मृत्यू झाला होता. लवकेश सोनी यांनी सन २००० साली वल्लभदास राठी यांच्याकडून टेंभुर्णा ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर २४ मधील १० प्लॉट विकत घेतले होते. तसेच लक्ष्मण निमकर्डे यांच्याकडून ४ प्लॉट, असे एकूण १४ विकत घेतले होते. दरम्यान, प्रेम रेसिडेन्सी हॉटेलचे संचालक आरोपी प्रदीप प्रेमसुखदास राठी याने या १४ प्लॉटची सन २००४ मध्ये मृतक लवकेश सोनी यांच्याकडून खरेदी खत दस्त क्रमांक १५३०ने खरेदी केल्याचे दाखवीत सदर प्लॉटवर आपल्या नावांची नोंद केल्या.
बनावट निघाले खरेदी खत
मृत लवकेश सोनींकडून खरेदी खताने खरेदी केल्याचे दाखवीत या प्लॉटवर आरोपी राठीने आपल्या नावाची नोंद केल्या बाबतची माहिती तक्रारदार मृत लवलेश सोनी यांच्या पत्नी अंजू सोनी यांना कळाली. त्यानंतर त्यांनी चौकशी केली असता आरोपी राठी याने घरीच खोटे शासकीय मुद्रांक, वेगवेगळ्या शासकीय अधिकाऱ्यांचे पदाचे खोटे शिक्के व त्यांच्या खोट्या सह्या करून खरेदी खत तयार ते मुद्रांक फ्रॅंकींग करून दस्तऐवज तयार केला. दस्तऐवज खरा असल्याचे भासवून सदरचे १४ प्लॉटची स्वतःच्या नावांची नोंद करून घेतली. एवढेच नव्हे तर यातील काही प्लॉट दुसऱ्यांना विकले. अंजू सोनी यांनी याबाबत दस्तऐवज क्रमांकाची दुय्यम निबंधक कार्यालयात चौकशी केली असता ते दस्त क्रमांक १५३० वर प्रदीप राठीची नावाची नोंद आढळून आली नाही. त्या दस्त क्रमांकावर दुसऱ्याच व्यक्तीची व दुसऱ्या जमिनीची खरेदीखत करण्यात आल्याचे समोर आले.
पोलिसांकडून तक्रारीची गंभीर दखल
लवलेश सोनी यांच्या नावावर असलेल्या टेंभुर्णा शिवारातील १४ प्लॉटचे बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर विक्री करुन तब्बल १ कोटी ६४ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार अंजू सोनी यांनी ११ जानेवारीला बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली. त्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात गंभीर दखल घेत चौकशीसाठी जिल्हा आर्थिक गुन्हे शाखाकडे प्रकरण पाठवले. जिल्हा आर्थिक गुन्हे शाखेने याबाबत खामगांव येथील दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन चौकशी केली व त्यांचा जबाब नोंदवला. आरोपी राठी यांच्याजवळील १४ प्लॉटची खरेदीखताचे दस्त बनावट असल्याचे दस्त क्र. १५३० वर राठी यांच्या नावाने दुय्यम निबंधक कार्यालयात नोंद नसून त्या दस्त क्रमांकवर दुसऱ्या जमिनीची खरेदी झालेली आहे, असे समोर आले. त्यामुळे चौकशी अंती स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने तक्रारदार अंजू सोनी यांच्या तक्रारीवरून खामगांव शहर पोलीस ठाण्यात आरोपी प्रदीप राठी विरुद्ध कलम ४२०, ४२३, ४६५, ४६८, ४७१, ४७२, ४७५, २५५, २६०,तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००६ नुसार ६६ नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
आरोपी राठीच्या घर व हॉटेलची पोलिसांकडून झाडा-झडती
गुन्हा झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे व खांमगाव शहर पोलिसांच्या संयुक्त दोन पथकाने आरोपी प्रदीप राठीच्या घरी व प्रेम रेसिडेन्सी हॉटेलवर छापा मारून यावेळी झाडा-झडती घेतली असता पोलीसांच्या हाती काहीच मिळालं नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.