बुलडाणा- चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक भरधाव कार नदीत कोसळली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सुलतानपूर राज्य महामार्गावरील सीतान्हाणी पुलाच्या वळणावर ही घटना घडली.
चालकाचे नियंत्रण सुटल्याने 50 फूट खोल नदीत कार कोसळली : दोघांचा मृत्यू - Accident news of Buldhana
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार 50 फूट खोल नदीत कोसळली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर, अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. सुलतानपूर राज्य महामार्गावरील सीतान्हाणी पुलाच्या वळणावर ही घटना घडली.
योगेश दत्ता अंभोरे (वय 30, वाशिम) आणि अजय शंकर इंगोले (वय 32, वाशिम) अशी मृतांची नावे आहेत. तसेच गणेश वाघ आणि ऋषीकेश अदमाणे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण कारने (एमएच 32 एएच 4369) वाशिमहून पुण्याला जात होते. लोणार तालुक्यातील सीतान्हाणी पुलावरील वळण मार्गावर कारचा अपघात झाला. नियंत्रण सुटल्याने ही कार 50 फूट खोल नदीत कोसळली. अपघातात कारचा अक्षरश: चुराडा झाला. क्रेनच्या सहाय्याने कार नदीतून बाहेर काढण्यात आली.
मागील तीन वर्षांपासून पंढरपूर - शेगाव पालखी मार्गाचे काम सुरू आहे. नदी पुलाचे काम देखील ठप्प आहे. शिवाय रस्ता खराब असल्याचे फलक देखील लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे वाहन चालकास रस्त्याचा अंदाज येत नसल्याने हा अपघात झाला असल्याचे काहींचे म्हणणे आहे.