बुलडाणा- बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून पिस्तूल, २ काडतुसे आणि कार असा साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीचा एक साथीदार मात्र, फरार झाला आहे. जलंब पोलीस ठाण्याअंतर्गतच्या नांदुरा खामगाव हायवेवर सोमवारी 30 नोव्हेंबरच्या मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कारवाई
नांदुरा येथील 40 वर्षीय अब्दुल मोबीन अब्दुल समद रा.आठवडी बाजार हा विनापरवाना शस्त्र बाळगत असल्याची खबर पोलीसांना खबऱ्याकडून मिळाली होती. यावरुन जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चवरीया, अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत, बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनात व स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रमुख बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस पथकाने सापळा लावला. हायवेवरील एका ढाब्याजवळ रात्री एकपर्यंत पोलीस दबा धरुन बसले होते. दरम्यान, आरोपी अब्दुल मोबीन अब्दुल समद सहकाऱ्यांसह ढाब्याजवळ आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. या कारवाईत पथकाने झायलो कार, एक मॅक्झिन असलेली पिस्तूल, 1 जिवंत काडतूस, 1 खाली काडतूस केस, 3 मोबाईल फोन असा 5 लाख 61 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
एक आरोपी फरार
आरोपीचा एक साथीदार फरार होण्यात यशस्वी झाला. आरोपी अब्दुल मोबिन याच्या विरोधात जलंब पोस्टेमध्ये शस्त्र अधिनियम 3/25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, गजानन आहेर, युवराज शिंदे, सतीश जाधव, सरिता वाकोडे, सचिन जाधव हे सहभागी झाले होते.