महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'जवानाच्या कुटुंबीयांना दिलेला धनादेश परत घेतल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार' - जिल्हाधिकारी

जवान राठोड यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. मात्र, धनादेश दिलेल्या खात्यामध्ये पैसे नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर धनादेश परत घेण्यात आला होता. त्यातून नवा वाद उफाळला. आता खात्यात पैसे टाकून त्यांना पुन्हा धनादेश देण्यात आला आहे.

विनोद वाघ

By

Published : Feb 23, 2019, 3:03 PM IST

Updated : Feb 23, 2019, 3:52 PM IST

बुलडाणा - वीरमरण आलेल्या जवान राठोड यांच्या कुटुंबीयांना दिलेला ५० लाख रुपयांचा धनादेश परत घेतल्याप्रकरणात सरकारची चूक नसून जिल्हा प्रशासनाची चूक आहे, असा आरोप भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव विनोद वाघ यांनी केला आहे. जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला. यासंदर्भात आपण मुख्यमंत्र्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

जवान राठोड यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला होता. मात्र, धनादेश दिलेल्या खात्यामध्ये पैसे नसल्याचे प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर धनादेशपरत घेण्यात आला होता. त्यातून नवा वाद उफाळला होता. आता खात्यात पैसे टाकून त्यांना पुन्हा धनादेश देण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील नितीन राठोड तर मलकापूर येथील संजय राजपूत या २ जवानांना पुलवामा हल्ल्यात वीरमरण आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाखांची मदत जाहीर केली. आई, वडील यांना २०-२० टक्के आणि पत्नीला ६० टक्के, असे या शासकीय मदतीचे स्वरूप आहे. गेल्या शनिवारी त्यांच्यावर त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी चोरपांगरा येथे जवान राठोड यांच्या कुटुंबियांना माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजीवराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते ५० लाखांचा धनादेश देण्यात आला होता.

वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाने बुलडाणा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सतीश केंजळे यांनी मंत्री निलंगेकर यांच्या हस्ते प्रसिद्धीसाठी कुटुंबीयांना तात्पुरत्या स्वरुपाचा धनादेश दिला. त्यानंतर लगेचच काही वेळात धनादेश परत घेण्यात आला. धनादेश दिलेल्या शासनाच्या खात्यात धनादेश वटण्याइतका निधी नसल्यामुळे तो बाऊन्स झाला असता. त्यामुळे धनादेश परत घेण्याचे समोर आले होते.

पालकमंत्री मदन येरावार जवान राठोड यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी आले असता त्यांनीही खात्यात तरतूद नसल्याने धनादेश परत घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. आता कुटुंबाला धनादेश दिला आहे. मात्र, खात्यात राशी आहे, की नाही हे पाहणे जिल्हा प्रशासनाचे काम आहे. जिल्हाधिकरी डॉ. निरुपमा डांगे यांच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे विनोद वाघ यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Feb 23, 2019, 3:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details