समृद्धी महामार्गावर दारू विक्री, व्हिडिओ व्हायरल बुलढाणा :समृद्धी महामार्गावर खासगी बसचा नुकताच अपघात झाला होता. त्यामध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघाताच्या चौकशी अहवालामध्ये त्या ट्रॅव्हल्सचा चालक हा दारू प्यायलेला होता, असे निष्पन्न झाले. अपघातानंतर जिल्हा प्रशासनाने उपाययोजनेसाठी अनेकवेळा बैठका घेतल्या. समृद्धीवर अनेक पथकेही नेमली, मात्र त्याची अंमबजावणी किती झाली, हे पाहणे गरजेचे आहे.
दारूविक्रीचा व्हिडिओ व्हायरल :या महामार्गावर अनेक ठिकाणी अवैध हॉटेल सुरू झाले आहेत. त्यामधे अवैधपणे दारूविक्री सुरू आहे. हे एका व्हायरल व्हिडीओमध्ये उघड झाले आहे. समृद्धी महामार्गावर कोणतीही गाडी उभी करण्यास मनाई आहे, असे असताना सुद्धा मार्गाच्या दोन्ही बाजूला ट्रकच्या रांगा लागलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या कारणामुळे अनेकवेळा अपघात झाले आहेत. मात्र, हे सगळे होत असताना प्रशासन काय करते? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक :बुलढाणा जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा जवळील पिंपळखुटा गावाजवळ एक जुलै रोजी विदर्भ ट्रॅव्हलच्या खासगी बसचा भीषण अपघात होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळपूर्ण झाला आहे. समृद्धी महामार्गावर जुलै महिन्यात अपघाताचे प्रमाण कमी झाले असले, तरी यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती. त्यामुळे ती तशीच कायम राहावी. अन्यथा पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण होवू शकते. दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये समृद्धी महामार्गालगत असलेल्या आरोग्य यंत्रणेच्या सक्षमीकरणावर जोड देण्याची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग व जिल्हा शल्य चिकित्सक अंतर्गत असलेल्या यंत्रणांनी दीर्घकालीन नियोजन करणे गरजेचे आहे. 2 जुलै ते 30 जुलै दरम्यान पाच किरकोळ अपघात झाले.
अपघात टाळण्यासाठी उपाययोजना :रस्ते अपघात टाळण्यासाठी समृद्धी महामार्गावर प्रत्येकी सहा किलोमीटर अंतरावर झेंडे लावण्यात आले आहेत. सोबतच प्रति तीन किलोमीटरवर अंतरावर रंबलसर लावण्याची प्रक्रिया आता निवेदित आहे. परंतु या मार्गावरील कळीचा मुद्दा ठरलेला 'वे साईड अँमिनिटीज'चा प्रश्न अद्याप गुलदस्त्यात आहे. तीन वेळा निविदा प्रक्रिया होऊन हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे एमएसआरडीसीने हा प्रश्न अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. पण, वरील सर्व बाबी प्रशासकीय पातळीवर होत आहेत. परंतु काही दिवसापूर्वीच या समृद्धी महामार्गावर एक दुचाकीस्वार प्रवास करत असलेला व्हिडिओ आणि त्यापाठोपाठ आता मध्यविक्रीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रशासनाला अजून कडक निर्बंध करण्याकरिता पावले उचलणे गरजेचे आहे. व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही भारत पुष्टी देत नाही.
हेही वाचा :
- Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावर महामृत्युंजय यंत्राची स्थापना करणे भोवले; एकावर जादूटोणा विरोधी कायद्यान्वये गुन्हा
- Samriddhi Highway Accident Issue : समृद्धीवरील अपघात रोखण्यासाठी 'Let the Road talk' संकल्पना राबविणार; जिल्हा पोलीस अधीक्षकांचा पुढाकार
- Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य - दादा भुसे