अपघातातील मृतकांवर अंत्यसंस्कार बुलढाणा : अपघातात मृत झालेल्या 24 जणांवर बुलढाणा येथे सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आला आहे. त्यासाठी सर्व 24 मृतदेह स्मशानभूमीत आणण्यात आले. त्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. संपूर्ण स्मशानभूमीला पोलिसांनी गराडा घातला आहे. स्मशानभूमी परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. एका मृतदेहावर मुस्लिम धार्मिक पद्धतीने करण्यात येणार आहेत. हा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे..
बसमधील मृतकांच्या अंत्यविधीची तयारी पूर्ण झाली आहे.. बुलडाणा शहरातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमित या सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सिंदखेड राजा जवळील बस अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला होता.. या सर्व मृतदेहांचा आता अंत्यविधी केला जाणार आहे. विधी विविध पद्धतीनं या मृतदेहांचा अंत्यविधी करण्यात येणार असल्याचे बुलढणा नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी दिगंबर साठे यांनी सांगितले.
बुलढाण्यातील सिंदखेडराजा हद्दीतील पिंपळखुटा येथे शनिवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास खाजगी बसचा अपघात झाला होता. या अपघात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्या मृतकांचे मृतदेह बुलढाण्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. शनिवारी मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक प्रशासनाने भूमिका घेत सर्वांच्या मृतदेहावर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. या अपघातातील मृतकांवर मृतदेह नेण्यासाठी 5 स्वर्ग रथ सजवण्यात येत असून काही वेळात बुलढाणातील त्रिशरण चौकातील हिंदू स्मशानभूमी मृतकांवर सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. यावेळी नातेवाईकांचे आक्रोश पाहायला मिळत आहे.
यंत्रणा तातडीने कामाला : बुलढाण्यातील सिंदखेड राजाजवळ समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात सर्वात मोठे आव्हान मृतदेहांची ओळख पटवणे होते. त्याकरिता यंत्रणा तातडीने कामाला लागली. फॉरेन्सिक टीमचे डीएनए चाचणी करण्याकरिता प्रयत्न सुरू झाले आहे, पण तरी 24 तास टीमने काम केले तरी चार ते पाच दिवस लागू शकतात, असे ही गिरीश महाजन म्हणाले होते. सर्व नातेवाईकांसमोर मंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत बोलणी झाल्यानंतर नातेवाईक अंतिम संस्कारासाठी तयार झाले.
बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार : मृत्युमुखी पडलेल्यांवर आज बुलढाण्यातच सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची महिती मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले होते. मृतकांचे नातेवाईक बुलढाण्यात पोहचले आहे. एकंदरीत या शोकाकुल घटनेवर आता सामूहिक अंत्यसंस्काराद्वारे आज या मृतकांवर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. ही बस नागपूरवरुन पुण्याला जात होती. अपघातस्थळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी भेट दिली आहे. तसेच त्यांनी जखमींचीही रुग्णालयात जाऊन विचारपूस केली होती.
बसच्या डिझेल टँकचा स्फोट : समृद्धी महामार्गावरून विदर्भ ट्रॅव्हल्सची बस पुण्याकडे जाताना सिंदखेडराजाजवळ आली होती. त्याचवेळी चालकाच्या बाजूचे टायर अचानक फुटले आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. यानंतर बस डिवायडरला धडकली. त्यामुळे बसच्या डिझेल टँकचा स्फोट झाला. या स्फोटानंतर भीषण आग लागली व यात 25 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रॅव्हल्सच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आयुष गाडगे, कौस्तुभ काळे, कैलास गंगावणे, इंशांत गुप्ता, गुडीया शेख, अवंती, पोहनकर, संजीवनी गोटे, प्रथमेश खोडे, श्रेया वंजारी, वृक्षाली वनकर, ओवी वनकर, शोभा वनकर या व्यक्तींची आतापर्यंत ओळख पटलेली आहे.
हेही वाचा :
- Buldana Bus Accident: बुलडाणा येथील बस अपघाताची चौकशी करा- रामदास आठवले
- Buldhana Bus Accident : समृद्धी महामार्गावर झालेली दुर्घटना दुर्दैवी, अशोक चव्हाणांची भाजपवर टीका
- 3 killed On Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर आयशरला क्रूझर धडकून भीषण अपघात; पती पत्नीसह दीड वर्षाची चिमुकली ठार