बुलडाणा- गेल्या 9 दिवसांपासून उपचार घेत असलेल्या 6 वर्षीय मुलाचा रेनबो बाल रुग्णालयात अचानक मृत्यू झाल्याने मुलाच्या नातेवाईकांनी बालरोग तज्ञ डॉ.जयसिंग मेहेर यांना रुग्णालयात मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (29 ऑगस्ट)ला घडली. या प्रकारात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांना केला आहे. मृत पावलेल्या मुलाचे नाव सोहम सुभाष डाबेराव असून, तो नांदुरा तालुक्यातील टाकरखेड येथील राहवासी आहे.
संबंधित प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या प्रकरणाच्या पुढील चौकशीसाठी पोलिसांनी उपचाराची कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. या बालकाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या नातेवाईकांनी डॉक्टरांविरोधात अद्याप तक्रार नोंदवली नसून, मृत्युचे कारण समोर येण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.
हेही वाचा: बुलडाणा : श्रावण सोमवारनिमित्त जटाशंकर दर्शनाला गेलेला तरुण शिवणी तलावात बुडाला
याप्रकरणी रेनबो रुग्णालयातील डॉक्टरांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे.