बुलडाणा- जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचा एकही प्लांट उपलब्ध नाही. त्यासाठी तसे प्लांट निर्मित व्हावे, अशी मागणी आम्ही केली आहे. मात्र कालच केंद्र शासनाच्यावतीने बुलडाणा जिल्ह्यासाठी हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट मंजूर झाले असून त्याचे साहित्य जिल्ह्यात पोहोचले आहे. येत्या आठवडाभरात जिल्ह्यातच ऑक्सिजनची निर्मिती होईल. अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
सुसज्ज असे आयसोलेशन कोविड सेंटरही तयार करणार-
कोरोनाची परिस्थिती पाहता बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पैशातून एक सुसज्ज असे आयसोल्युशन कोविड सेंटर तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती ही आमदार डॉ.संजय कुटे यांनी यावेळी दिली.
महाराष्ट्र शासनानेही लसीची खरेदी करून निशुल्क उपलब्ध करावी-
केंद्र सरकारकडून कोविशिल्ड आणि इतर कंपन्यांना लस विक्रीसाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे काही राज्यांनी ते खरेदी करून जनतेमध्ये नि:शुल्क लसीकरणास सुरुवात केली आहे. याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही लसीची खरेदी करून ती नागरिकांसाठी निशुल्क उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार डॉ. संजय कुटे यांनी पत्रकार परिषदेत केली.