बुलडाणा -जिल्ह्यामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आजच्या (रविवार, 21 फेब्रुवारी) बुलडाणा आठवडी बाजारात पूर्णतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी घेतल्याने आज आठवडी बाजारात शुकशुकाट पाहायला मिळाला.
भाजी मंडई पूर्णतः बंद
आज आठवडी बाजारातील दुकाने, भाजी मंडई पूर्णतः बंद ठेवण्यात आली होती. शिवाय रविवारी आठवडी बाजारानिमित्त शहरातील मुख्य बाजारपेठेमधील दुकाने तसेच फेरीवाले यांनीसुद्धा दुकाने लावली नाहीत.
पोलीस व नगर परिषद प्रशासन तत्पर
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कोठेही पायमल्ली होणार नाही, या दृष्टिकोनातून सकाळपासूनच नगर परिषद प्रशासन आणि पोलीस दलाचे अधिकारी-कर्मचारी कोठेही गर्दी होणार नाही व दुकाने लागणार नाहीत याकडे लक्ष ठेवून होते.
बाहेर गावचे व्यापारी आले अन् परत गेले
आज रविवारीचा बाजारपेठ बंद राहणार आहे. हे आदेश शनिवारी 20 फेब्रुवारीच्या सायंकाळी निर्मित झाले. याची माहिती बाहेर गावांच्या व्यापाऱ्यांना नसल्यामुळे ते नेहमीप्रमाणे आज भाजीपाला व कपड्याच्या दुकानाचे साहित्य घेऊन दुकान लावण्यासाठी बुलडाणा शहरामध्ये दाखल झाले होते. परंतु बाजारपेठेत बंद असल्यामुळे त्यांना आपला भाजीपाला परत घेऊन जावा लागला.
उपचार घेणारे सर्वात जास्त कोरोनासंक्रमित बुलडाणा शहरातील
बुलडाणा जिल्ह्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव वाढत असून जिल्ह्यामध्ये 1163 बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील सर्वात जास्त रुग्ण हे बुलडाणा शहरातील असल्यामुळे हा प्रादुर्भाव कमी करण्याच्या दृष्टिकोनातून बुलडाणा जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी बुलडाण्याच्या आठवडीबाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.