बुलडाणा -बुलडाणा नगराध्यक्षा पती मोहम्मद सज्जाद व नगर परिषदेचे लेखापाल अमोल इंगळे यांच्यामध्ये मंगळवारी 9 फेब्रुवारीला शाब्दिक चकमक झाल्याची घटना घडली. त्यानंतर आज बुधवारी 10 फेब्रुवारीला नगरपरिषद अधिकारी-कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलन पुकारले. मोहम्मद सज्जाद यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अत्यावश्यक सेवा वगळून कामबंद
नगर परिषद बुलडाणा येथील नगर लेखापाल अमोल इंगळे यांना नगरपरिषद कार्यालयीन कामकाजाविषयी नगरपरिषद अध्यक्षा यांचे पती मो. सज्जाद अ. खालीद यांनी मंगळवारी 09 फेब्रुवारी रोजी कार्यालयीन वेळेत दलीतवस्ती योजनेतील विकास कामांची देयके कंत्राटदार अविनाश गायकवाड यांना मला न विचारता दिले कसे सांगत शिवीगाळ केली. या प्रकरणाचा निषेध नोंदवून आज बुधवारी 10 फेब्रुवारी रोजी पूर्ण दिवस बुलडाणा नगर परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून कामबंद आंदोलन केले.
'माफी मागेपर्यंत आंदोलन सुरू राहणार'
मो. सज्जाद माफी मागत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन सुरुच राहील, असा इशारा यावेळी कर्मचारी व अधिकांऱ्यांनी दिला. दरम्यान यासंबंधीची तक्रार कर्मचाऱ्यांच्यावतीने जिल्हाधिकारी व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी नगराध्यक्ष पती मो. सज्जाद यांना त्यांच्या प्रतिक्रियेसाठी फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही.