बुलडाणा -नगर परिषदेच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मोहम्मद सज्जाद यांचे पती मोहम्मद सज्जाद यांनी अखेर लेखाधिकारी अमोल इंगळे यांची दिलगिरी व्यक्त करीत माफी मागितल्याने नगर परिषद अधिकारी-कर्मचारी संघटनेने सुरू केलेल्या कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले आहे, असे लेखाधिकारी अमोल इंगळे यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे.
नगराध्यक्षा नजमुन्नीसा यांचे पती मोहम्मद सज्जाद यांनी केली होती शिवीगाळ
नगर परिषद बुलडाणा येथील नगर लेखापाल अमोल जीवनसिंग इंंगळे यांना नगरपरिषद अध्यक्षा नजमुन्नीसा यांचे पती व नगरसेवक मोहम्मद सज्जाद यांनी मंगळवारी (ता. 9) वादावादी करत शिवीगाळ केली होती. दलितवस्ती योजनेतील विकास कामांचे देयके कंत्राटदार अविनाश गायकवाड यांना मला न विचारता दिलेच कसे, असे विचारत इंगळे यांच्याशी बोलताना अपशब्द वापरले होते. सज्जाद यांनी इंगळे यांच्याशी नगर परिषदेत कार्यालयीन कामकाजाविषयी कार्यालयीन वेळेत वादावादी करत कामकाजामध्ये अडथळा निर्माण केला होता. या प्रकाराचा निषेध नोंदवून बुधवारपासून (ता. 10) बुलडाणा नगर परिषदेचे सर्व कर्मचाऱ्यांनी अत्यावश्यक सेवा वगळून कामबंद आंदोलनाला सुरुवात करून मोहम्मद सज्जाद यांनी माफी मागावी अशी मागणी केली होती.
अखेर सज्जाद यांनी दिलगिरी व्यक्त करीत माफी मागून पुन्हा असे होणार नाही, अशी ग्वाही दिल्याने कामबंद आंदोलन मागे घेण्यात आले. लेखाधिकारी अमोल इंगळे यांनी ही माहिती दिली. अधिकारी-कर्मचारी हेदेखील माणूस असून त्यांना चांगली वागणूक देण्याचे आवाहन इंगळे यांनी नगर परिषदेचे पदाधिकारी व नागरिकांना केले आहे.
दिलगिरी व्यक्त केली नाही, मोहम्मद सज्जाद यांचे घूमजाव
दरम्यान आपण माफी मागून दिलगिरी व्यक्त करून केल्याने नगर परिषद अधिकारी-कर्मचारी संघटनेने कामबंद आंदोलन मागे घेतले, असे जाहीर करण्यात आल्याचे सांगताच त्यांनी कुठल्याही प्रकारची माफी मागितल्याचे नाकारले. नगर परिषदमधील अधिकारी-कर्मचारी हा आमचा परिवार आहे. परिवारमध्ये मतभेद होतच असतात. कामबंद आंदोलनावेळी लेखाधिकारी इंगळे यांची गळाभेट घेऊन प्रकरण मिटवले, अशी प्रतिक्रिया नगराध्यक्षा यांचे पती तथा नगरसेवक मोहम्मद सज्जाद यांनी दिली.