बुलडाणा - महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. यात जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव या गावातील काही शेतकऱ्यांची नावे आहेत. तर, काहींची नावेच नसल्याने त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावातील सर्व शेतकऱ्यांची नावे या यादीत समाविष्ट करावीत, या मागणीसाठी गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील सुनगांव मध्ये एक हजार ते एक हजार दोनशे शेतकरी आहेत. कर्जमुक्तीच्या पहिल्या यादीत 360 ते 365 शेतकऱ्यांचे नावे आली आहेत. तर, दुसऱ्या यादीमध्ये पाच ते दहा शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत. उर्वरित शेतकऱ्यांची नावे यादीत समाविष्ट होण्यासाठी वाट पाहात आहेत. बँक प्रशासनाकडून हेतुपुरस्सर या शेतकऱ्यांची नावे या यादीमध्ये घेतली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.