बुलडाणा -थकीत वेतन मिळावे, या मागणीसाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोर जिजामाता सहकारी साखर कारखान्यातील कामगारांनी शुक्रवारी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलना दरम्यान जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना कामगारांनी धक्काबुक्की केली. या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी काळ्या फीती लावून कार्यालयीन कामकाज केले. पोलिसांच्या समोरच धक्काबुक्की झाल्याने पोलिसांचा देखील यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. पुन्हा अशी घटना होऊ नये म्हणून प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केली.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फीती लावून केले कामकाज काय आहे प्रकरण -
बुलडाणा जिल्ह्यातील दुसरबीड जिजामाता सहकारी साखर कारखाना गेल्या काही वर्षांपासून बंद आहे. तिथे काम करणाऱ्या 700 च्यावर साखर कामगारांचे वेतन अनेक वर्षांपासून पासून रखडलेले आहे. कारखान्यातील साखर विकलेल्या रकमेतून वेतन द्यावे, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. मात्र, अद्यापर्यंत कामगारांना 3 कोटी 75 लाख रुपयांचे थकीत वेतन मिळालेले नाही. वेतनाचे प्रकरण सध्या जिल्हा उपनिबंधकांकडे आहे. राज्य बँक कारखान्याचे अवसायक असलेल्या जिल्हा निबंधक यांच्या खात्यात थकीत वेतनाची रक्कम पाठवल्यानंतर कामगारांना वेतन मिळणार, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्या खात्यात वेतनाची रक्कम न आल्याने कामगारांचा प्रश्न जैसे थे राहिला. त्यामुळे साखर कारखाना कामगारांनी कंटाळून बुलडाण्याच्या जिल्हा उपनिबंधक कार्यालयातच ठिय्या आंदोलन सुरू केले. मंगळवारी 16 फेब्रुवारीसा दुपारी बैठकीला जात असलेल्या जिल्हा उपनिबंधक महेंद्र चव्हाण यांना कामगारांनी धक्काबुक्की केली. या प्रकाराच्या निषधार्थ जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बुधवारी काळ्या फीती लावून कार्यालयीन कामकाज केले. धक्काबुक्की होत असताना पोलीस उपस्थित असूनही त्यांनी कारवाई केली नाही, असा आरोप कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी लावला आहे.
पोलिसांनी आपले काम केले आहे -
उपनिबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या कारवाईवर टीका केली आहे. मात्र, पोलिसांनी या टीकेत तथ्य नसल्याचे म्हटले आहे. संबधित कार्यालयाने किंवा कार्यालय प्रमुखाने पोलीस बंदोबस्त मागितला नव्हता. या आंदोलनाची आम्हाला माहिती दिलेली नव्हती. आम्ही स्वतःहून तिथे गेलो होतो. उपनिबंधक कुठेतरी मिटींगला जात असताना अचानक ती घटना घडली. पोलिसांनी त्यांचे काम चोखपणे बजावले आहे. त्या ठिकाणी पत्रकार हजर होते त्यांच्याकडे चित्रफीती उपलब्ध आहेत. त्यामुळे उपनिबंधक कार्यालयाने नोंदवलेला निषेध वस्तुस्थितीला धरून नाही आहे, अशी भूमीका पोलिसांची आहे.