बुलडाणा -केंद्र सरकारने दुजाभाव करत महाराष्ट्रातील कांदा निर्यात बंदी कायम ठेवत कर्नाटक आणि आंध्रप्रदेशमधील निर्यात बंदी उठवली आहे. त्यामुळे केंद्र सरकार जाणीवपूर्वक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप आझाद हिंद संघटनेने केला आहे. तसेच केंद्र सरकारने काढलेल्या या अध्यादेशाची होळी करत आझाद हिंद संघटनेने निषेध व्यक्त केला.
बुलडाण्यात कांदा निर्यात अध्यादेशाची आझाद हिंद संघटनेकडून होळी - aazad hind sanghatana union gov onion export bill
केंद्र सरकारने कांदा निर्यातीबाबत काढलेल्या अध्यादेशाची बुलडाण्यात आझाद हिंद सेनेकडून होळी करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली.
कांद्यावरील निर्यात बंदी उठविण्यात यावी, यासाठी देशभर आंदोलन सुरू आहे. असे असताना केंद्र सरकारने दुसऱ्यांदा 9 ऑक्टोबरला फक्त आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील गुलाबी कांदा निर्यात करण्याची परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात हजारो टन कांदा सडत असताना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर जाणीवपूर्वक सलग दुसऱ्या वर्षी केंद्र सरकारने अन्याय केला आहे.
महाराष्ट्रासह देशातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना समान न्याय देणे क्रमप्राप्त असतांना फक्त आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यात आली. नरेंद्र मोदी हे फक्त आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचे पंतप्रधान नाही तर देशाचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत दुजाभाव करीत आहे हे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केंद्र सरकारकडून होत आहे. महाराष्ट्रातील शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर झालेला अन्याय निषेधार्ह आहे. केंद्र सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा आरोप करत आझाद हिंद शेतकरी संघटनेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. यावेळी केंद्र सरकार विरोधात नारेबाजी करण्यात आली.