बुलडाणा- टाळेबंदीच्या काळात वाढीव वीजबिले माफ करण्याचे आश्वासन देऊनही आता सक्तीची वसुली सुरू केल्याच्या विरोधात भाजपच्या वतीने 5 फेब्रुवारीला वीज वितरण कंपनीला टाळे ठोको, हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. चिखली भाजपच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय वीज वितरण कंपनी साकेगाव रस्ता येथे सकाळी 10 वाजता आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती भाजपच्या वतीने एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
महावितरण कंपनीने टाळेबंदीच्या काळामध्ये सरासरी वीजबिलाच्या नावावर भरमसाठ बिले देऊन ग्राहकांची लूट करण्याचा डाव रचलेला आहे. याविरोधात टाळेबंदीच्या काळातच आमदार श्वेता महाले यांनी अधीक्षक अभियंता कार्यालय वीज वितरण कंपनी बुलडाणा येथे भर पावसात ठिय्या आंदोलन करून शासनाच्या विरोधात आवाज उठविला होता. तसेच गावा-गावामध्ये ठिक ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने वीज बिलांची होळी करून शासनाकडून होणारी लूट चव्हाट्यावर आणली होती. तसेच चिखलीच्या उपविभागीय कार्यालय आणि गावातील प्रत्येक विजवितरण कंपनीच्या कार्यालयावर आंदोलने केली. त्यामुळे देण्यात आलेली वाढीव वीज बिले माफ करण्यात येतील, असे आश्वासन उर्जामंत्र्यानी दिले होते. परंतु, आघाडी सरकारच्या म्होरक्यांनी घुमजाव करत वाढीव बीले माफ करण्याऐवजी सक्तीच्या वसुलीचे आदेश देऊन विद्युत ग्राहकांची लूट करण्यात येत आहे.