बुलडाणा : जिल्ह्यातील शासकीय मका खरेदी केंद्र सुरू करावे, या मागणीसाठी मंगळवारी भाजपा आमदार श्वेता महाले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनामध्ये सहभागी असणाऱ्या भाजपा पदाधिकाऱ्यांवर आणि कार्यकर्त्यांवर बुलडाणा शहर पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील शासकीय केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना प्रति क्विंटल पाचशे ते सहाशे रुपयाने नुकसान सहन करावे लागत आहे. यासाठी राज्य शासनाने जिल्ह्यातील मका आणि तुरीचे खरेदी केंद्र सुरू करावे, त्वरित हमीभावाने या पिकांची खरेदी करावी आणि कापसाचे देखील उर्वरित चुकारे पूर्ण करावे. तसेच, या मागण्या 8 जूनपर्यंत पूर्ण कराव्यात असे निवेदन महालेंनी यापूर्वी दिले होते. तरीही हे केंद्र सुरू न झाल्याने, मंगळवारी महाले यांनी हे आंदोलन केले.
कोरोना महामारीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात साथरोग प्रतिबंधक कायदा लागू असतांना, मोर्चे व आंदोलन करण्यास मनाई आहे. कोरोनाचा प्रसार होवू नये, यासाठी श्वेता महाले यांच्या ठिय्या आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही मंगळवार, ९ जून रोजी त्यांनी घोषणाबाजी करुन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलन केल्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अभय पवार यांच्या तक्रारीवरून आमदार श्वेता महाले यांच्यासह भाजपाचे बुलडाणा तालुकाध्यक्ष मोहन पवार, चिखली शहराध्यक्ष पंडीरातराव देशमुख, संदीप उगले, अॅड. सुनिल देशमुख, प्रा. प्रभाकर वारे, विश्वनाथ माळी, नगरसेवक अरविंद होंडे, पदमनाभ बाहेकर, नितीन जयस्वाल, विनायक भाग्यवंत, मंदार बाहेकर, विजया राठी व चितळे या कार्यकर्त्यांवर कलम १४३, १४९, ३६९, २७०, १८८ व साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हेही वाचा :दिलासादायक..! बुलडाण्यात आज आठ कोरोना रुग्णांना ‘डिस्चार्ज'