बुलडाणा - सुधारित आणेवारी जाहीर करा, जिल्ह्यात भेदभाव न करता सर्व शेतकऱ्यांना मदत करा, अन्यथा राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मदत जाहीर करेपर्यंत झोपू देणार नाही, असा इशारा आज सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी भाजपाकडून खामगावात देण्यात आला.
दुबार पेरण्या अन् मुसळधार पावसाने शेतकरी हतबल
'खामगाव तालुक्यात सन् 2020-21 च्या खरीपाच्या पेरण्या जून, जुलैमध्ये आटोपल्या तेव्हापासून कुठे कमी कुठे जास्त पाऊस झाल्यामुळे पेरण्या उलटल्या तसेच बोगस बी, बियाणे मिळाल्यामुळे दुबार, तिबार पेरण्या कराव्या लागल्या. तर जुलैपासून मुसळधार पाऊस, महापूराने जमिनी खरडून पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नगदी पिक, मूग, उडीद, सोयाबीन, तिळ, पूर्णपणे सडले, केळी, मका, उस, कापूस पूर्णपणे नष्ट झाले. फळबाग अतिवृष्टीमुळे नष्ट झाल्या. उरला सुरला शेतकरी परतीच्या पावसाने देशोधडीला लागला.