बुलडाणा- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले होते, असा खळबळजनक आरोप केला. गृहमंत्री देशमुख यांच्या 100 कोटी वसूलीच्या निषेधार्थ बुलडाणा शहरातील जयस्तंभ चौकात माजी कामगार मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष आमदार डॉ.संजय कुटे यांच्या नेतृत्वात जोरदार निर्दशने करण्यात आले.
शिवालय ते जयस्तंभ चौकापर्यंत रॅली काढून निदर्शने
स्थानिक विश्रामगृह जवळील भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या शिवालय जनसंपर्क कार्यालय येथून संगमचौक मार्ग जयस्तंभ चौकापर्यंत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रॅली काढण्यात आली. यानंतर जयस्तंभ चौकात आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांच्यावतीने जोरदार निदर्शने देत गृहमंत्री देशमुख यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली.