बुलडाणा -जिल्ह्यातकोरोनाशी लढणारे डॉ. सैय्यद अरशद यांचा वाढदिवस सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत साजरा करण्यात आला. संकटाच्या काळात कर्तव्य बजावताना ही आनंदाची गोष्ट घडल्याने डॉ. सैय्यद भारावून गेले होते. 23 एप्रिलला त्यांचा वाढदिवस साजरा केला गेला.
कोरोनाच्या लढाईत आनंदाचा क्षण; सोशल डिस्टन्सिंग पाळत डॉक्टरांचा वाढदिवस साजरा कोरोनाच्या लढाईत पोलीस खात्यातील अधिकारी-कर्मचारी असो, आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्सेस जीवाची बाजी लावून लढत आहेत. यामुळे अनेक आनंदाच्या प्रसंगाना त्यांना मुकावे लागत आहे. नागरिक घरबसल्या वाढदिवस कसाबसा साजरा करतील. मात्र जे 'फायटर्स' कोरोनाशी लढत आहेत, त्यांना वाढदिवस साजरा करणे शक्यच होत नाही. मात्र, संकटाच्या काळात कर्तव्य बजावताना अचानकपणे आनंदाचे क्षण आल्याने डॉ. सैय्यद भारावून गेले.
राज्यात कोरोनाची संख्या वाढत असून जिल्ह्यातही मृत व्यक्तीसह 21 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण येथील स्त्री कोरोना रुग्णालयात विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे. या रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कुलकर्णी, डॉ. भुसारी, डॉ. वासेकर, डॉ. घायके, डॉ. मोहम्मद अस्लम, डॉ. सैय्यद अरशद याच्या सह अनेक डॉक्टर आणि नर्सेस, ब्रदर्स, सफाई कामगार, वाहन चालक यांच्यासह संपूर्ण रुग्णालय स्टाफ रुग्णांना कोरोनामुक्त करण्यासाठी लढत आहे.
बुलडाणा जिल्हा रुग्णालयतालील डॉक्टरांना 20 कोरोनाबाधित रुग्णांपैकी 14 रुग्णांना कोरोनामुक्त करण्यात यश मिळाले आहे. 14 जणांना कोरोना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. अशातच डॉक्टरांच्या टीममधील डॉ. सैय्यद अरशद यांचा 23 एप्रिलला वाढदिवस होता. डॉ. सैय्यद यांना आपल्या वाढदिवसबद्दल आठवण नव्हती मात्र, फेसबुक माध्यमाने डॉ. सैय्यद यांचा वाढदिवस गुरुवारी 23 एप्रिल असल्याचा कोरोना रुग्णालयातील इतर डॉक्टरांसह सर्व स्टाफला माहिती मिळाली. डॉ. सैय्यद यांना सरप्राईज देत 22 एप्रिलचा दिवस संपून 23 एप्रिल सुरू होताच कोरोना रुग्णालयात डॉ. सैय्यद कर्तव्यावर असताना सेल्फ डिस्टन्सिंग पाळून केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. अचानकपणे आपला वाढदिवस साजरा केल्याने डॉ. सैय्यद भारावून गेले होते. त्यांनी याबाबद्दल आपल्या वरिष्ठ डॉक्टर, त्यांच्या सोबतचे डॉक्टर, रुग्णालयातील सर्व स्टाफचे आभार मानले.