बुलडाणा- राज्यभरात सुप्रसिद्ध असलेल्या भेंडवळच्या घटमांडणीचे भाकीत आज जाहीर करण्यात आले. या भाकीतातून आर्थिक संकटासह नैसर्गिक संकटांचाही देशाला सामना करावा लागणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. पावसाचा अंदाज सर्वसाधारण राहणार असून पीकही साधारण राहणार आहे. देशाचा 'राजा' अर्थात पंतप्रधान कायम राहणार असून त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याचे भाकीतही या घटमांडणीतून करण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ येथील घटमांडणीला 300 वर्षाचा इतिहास आहे. येथील पुंजाजी महाराजांनी अक्षय तृतीयेच्या सायंकाळी या घटाची मांडणी केली होती. आज परंपरेनुसार या घटनांचे भाकीत वर्तवण्यात आले. त्यात पुंजाजी महाराज यांनी घटात ठेवण्यात आलेल्या विविध धान्याच्या राशींवरून भाकीत वर्तवले. देशावर होणारे दहशतवादी हल्ले कमी होणार नाहीत. मात्र दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी देशाचे संरक्षण खाते सक्षम राहील, असे भाकीतही घटमांडणीतून वर्तवण्यात आले आहे.