बुलढाणा: शेगाव जि. बुलढाणा दि. २२ नोव्हेंबर राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे संपूर्ण खरीप उद्धवस्त झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांनी पीकविम्य़ाचे हप्ते भरले आहेत, पण अद्यापही त्यांना शासकीय मदत किंवा पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळालेली नाही. मोदी सरकारच्या आशिर्वादाने विमा कंपन्याकडून शेतकऱ्याची खुले आम लूट सुरू आहे. ती थांबवून शेतकऱ्याची नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष लढा देणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही: शेगाव येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना नाना पटोले म्हणाले की, भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातून प्रवास करत असताना हजारोंच्या संख्येने शेतकरी राहुलजींना भेटले, अतिवृष्टी, पुरामुळे प्रचंड नुकसान झाल्याचे सांगितले. तसेच पीक विमा कंपन्यांकडून अद्याप मदत मिळाली नसल्याचे सांगितले. त्यांनी मांडलेली व्यथा पाहून या शेतकऱ्याचे मदतीसाठी लढा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. यासाठी राज्यातील सर्व जिल्हा व तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पीक विमा मदत कक्ष स्थापेन करण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यानी पीक विमा भरला आहे, पण त्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. अशा शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल क्रमांक व पीकविमा भरल्याची पावती (झेरॉक्स) ही कागदपत्रे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पीकविमा कक्षात जमा करून घेण्यात येणार आहेत. राज्यातील शेतक-यांना पीकविमा मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्ष पाठपुरावा करून लढाई लढेल असे पटोले म्हणाले.