बुलडाणा- आज (गुरुवारी) सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरातसह सर्व आखाती देशात चंद्र दर्शनानंतर रमजान ईद साजरी करण्यात आली. त्यानुसार शुक्रवारी (14 मे) संपूर्ण भारतात ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी करण्यात येणार आहे. रमजानचे 30 उपवास(रोजे) पूर्ण झाले असून उद्या मुस्लिम समाजाकडून कोरोनाच्या सावटाखाली ईद साजरी करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून मुस्लिम समाजातील नागरिकांनी घरातच ईदची नमाज पठण करावे, असे आवाहन मुस्लिम धर्मगुरूंनी केले आहे.
माहिती देताना हाफिज खलीलउल्लाह शेख रमजान महिन्यात रोजे (उपवास) करून करण्यात येते अल्लाहाची ईबादत
मागील वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही रमजान ईदचा सण घरीच साजरा करण्यात येणार आहे. रमजानचा महिना पूर्ण झाल्यावर ईद साजरी केली जाते. रमजान महिन्यात 29 किंवा 30 रोजे (उपवास) करून अल्लाहाची ईबादत करण्यात येते. शेवटी 29 किंवा 30 दिवसांचे रोजे (उपवास) पूर्ण झाल्यावर चंद्र दर्शन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. सर्व आखाती देशात 12 मे रोजी 30 रोजे पूर्ण झाल्यावर चंद्रदर्शन झाल्याने तेथे आज (13 मे) ईद साजरी करण्यात आली आहे. तर भारतात आज (गुरुवारी) चंद्र दर्शन झाले असून शुक्रवारी (14 मे) रमजान ईद साजरी होणार आहे. दरम्यान, मुस्लिम धर्मगुरू आणि मौलवींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरीच राहून ईद साजरी करण्याचे आवाहन मुस्लिम समाजाला केले आहे. ईदच्या दिवशी हस्तांदोलन किंवा गळाभेट न करता सोशल डिस्टन्सिंगचे पालन करा आणि एकमेकांना ईदच्या शुभेच्छा द्या, असे आवाहनही मुस्लिम धर्मगुरूंनी केले आहे.
हेही वाचा -मलकापूराच्या लसीकरण केंद्रावर टोकनमध्ये हेराफेरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला नागरिकांनी दिला चोप