बुलडाणा - अन्याय, अत्याचार झालेल्या अल्पवयीन, निराधार, कुमारी माता आदि मुलींकरीता बुलडाण्यात लवकर निरीक्षण गृह तयार करणार असल्याचे राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले. यशोमती ठाकूर बुलडाण्याच्या दौऱ्यावर असतांना त्यांनी बाल सुधार गृहाला भेट दिली. यावेळी त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
मुलींसाठी बाल सुधार गृह सुरू करू-
अन्याय, अत्याचार झालेल्या अल्पवयीन, निराधार, कुमारी माता आदि मुलींना बाल सुधार गृहात ठेवण्यात येते. मात्र या मुलींना पाच दिवसांपेक्षा जास्त निवारा देण्याची परिस्थिती आल्यास जिल्ह्यात तशी व्यवस्था नाही. या मुलींना अकोला, अमरावती, औरंगाबाद याठिकाणच्या सुधार गृहात पाठवावे लागते. त्यासाठी बाल संरक्षण समितीला अनेक अडथळयांचा सामना करावा लागतो. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यात मुलींचे सुधार गृह व्हावे, यासाठी बाल संरक्षण समिती कडून महिला व बालकल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला होता.
मात्र काही तांत्रिक अडचणी मुळे हा प्रस्ताव प्रलंबित होता. दरम्यान, या सर्व तांत्रिक अडचणी पूर्ण करून लवकरच जिल्ह्यात मुलींसाठी निरीक्षण गृह सुरू करण्यात येणार असल्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले आहे.
हेही वाचा-कर्जाला कंटाळुन निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाची आत्महत्या, तिघांनी घेतला गळफास