बुलडाणा - एमआयएम पक्षाचे माजी आमदार वारिस पठाण यांनी कर्नाटकात एका सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. पठाण यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर देशभरातून जोरदार टीका झाली. बुलडाणा येथील एका मुस्लीम तरुणाने पठाण यांना फेसबुकच्या माध्यमातून वेगळ्याच शब्दात उत्तर दिले आहे. सय्यद इकबाल (रा. धाड) असे या तरुणाचे नाव आहे. सय्यद हा शिवसेनेच्या महाराष्ट्र वाहतूक सेनेचा उपाध्यक्ष आहे.
वारीस पठाणांचे 'ते' वादग्रस्त विधान; बुलडाणाच्या मुस्लिम तरूणाने दिले 'हे' उत्तर काय म्हणाला सैय्यद -
'आम्ही आपल्या 15 कोटी जनतेमध्ये सहभागी नाही. आम्हांला 100 कोटींवर भारी पडायचे नाही. या 100 कोटींमध्ये असे काही आहेत, जे स्वत:च्या जीवापेक्षा आमच्यावर जास्त प्रेम करतात आणि आम्हा 15 कोटींच्या न्याय-हक्कासाठी लढवून आमच्या सुख-दुःखात आमच्यासोबत उभे राहतात. आजपर्यंत काळा चष्मा लावून व्यर्थ बोलणे आणि दुकानाचे उद्धाटन करणे, याशिवाय तुम्ही काय केले? आणि आमदाराच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात आपण मुस्लीम समाजासाठी काहीच केले नाही. धर्माच्या राजनितीमध्ये सहभागी होणारा मी अंधभक्त नाही'
सय्यद इकबाल या तरूणाने दिलेले उत्तर. वारिस पठाणांचे वादग्रस्त वक्तव्य -
‘आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचे असून ते मागून मिळत नसते, तर हिसकावून घ्यायचे असते. आता फक्त वाघिणी (मुस्लीम महिला) पुढे आल्या, तर तुम्हाला घाम फुटला. जर आम्हीही सोबत आलो, तर काय होईल? आपण १५ कोटी असून १०० कोटींना भारी पडू' असे वादग्रस्त विधान पठाण यांनी केले होते.