बुलडाणा - राज्यभरात घरफोड्या आणि जबरी चोऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळीचा प्रमुख म्होरक्या कुख्यात संजूसिंग कृष्णासिंग भादा (वय 25 वर्ष) याला खामगाव पोलिसांनी बुधवारी पहाटे बेड्या ठोकल्या आहेत. जालना येथील गुरुगोविंदसिंग कॉलनी येथील त्याच्या घरातून खामगावात चोरीसाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी तवेरा कार ताब्यात घेत त्याला गजाआड केले आहे. या आरोपींवर राज्यभरात दरोडे, जबरी चोऱ्या, फसवणूक, आर्मअॅक्ट आणि रस्ता लुटीचे असे एकूण 28 गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
नांदुरा रोडवरील 2 मेडिकलमध्ये झाली होती 3 लाख 20 हजारांची चोरी
दोन दिवसांपूर्वी खामगाव शहरातील नांदुरा रोडवरील तुळजाई मेडिकल व लाइफलाइन हॉस्पिटलमधील सुभाष मेडिकल येथे 21 जून रोजी रात्री तवेरा गाडीने येऊन अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून दोन्ही मेडिकलमधून एकूण 3 लाख 20 हजारांची चोरी केली होती. ही घटना मेडिकलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या प्रकरणाच्या तपासादरम्यान खामगाव शहर पोलिसांना आपल्या खबऱ्याद्वारे आरोपी जालना येथील असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी जालना येथून गुरुगोविंदसिंग कॉलनीमधून संजूसिंग कृष्णासिंग भादा याला ताब्यात घेतले आहे. शिवाय खामगावातील मेडिकलमधील चोरीच्या वेळी वापरलेली तवेरा चारचाकी वाहन ही ताब्यात घेण्यात आले आहे.