बुलडाणा - गैरप्रकार करून शासनाचा कोट्यवधींचा कर बुडवल्याचा आरोप बुलडाण्याच्या तत्कालीन एआरटीओ आणि सध्याच्या डेप्युटी आरटीओ जयश्री दुतोंडे यांच्यावर करण्यात आला आहे. याप्रकरणी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक संतोष हाडे यांनी परिवहन आयुक्तांकडे केली आहे.
यासोबतच, शिवसेनेचे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय मोटे यांनीही महिंद्रा आणि टाटा कंपनीसोबत त्यावेळच्या एआरटीओ आणि सध्याचे डेप्युटी आरटीओ अधिकाऱ्यांनी सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. याशिवाय, मेहकर विधानसभेचे आमदार डॉ. संजय रायमूलकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात बुलडाणा डेप्युटी आरटीओ कार्यालयाच्या अधिकाऱ्याच्या झालेल्या तक्रारी संदर्भात चौकशी करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता.
टाटा मॅजिक, महिंद्रा मॅक्झिमो डिझेल वाहनावर चढविण्यात आलेला 6+1 चा टॅक्सी परवाना नियम बाह्य चढविण्यात आल्याचा आरोप हाडे यांनी केला आहे. वाहनाच्या इंजिनची क्षमता ही कमी असून जास्त क्षमता असलेला इंजीनचे वाहन नियमानुसार 6+1 टैक्सी परवान्यावर चढविले गेले पाहिजे. विशेष म्हणजे सदर वाहनावरटॅक्सी परवाना चढविताना कमी कर लागते आणि सदर वाहन खासगी पासिंगसाठी वाहनाच्या किंमतीवर 12 टक्के कर लागतो. मात्र सध्याचे डेप्युटी आरटीओ आणि तत्कालीन एआरटीओ असलेल्या जयश्री दुतोंडे यांनी अधिकाराचा गैरवापर करीत 2000 ते 2500 मॅक्झिमो आणि मॅजिक वाहनावरटॅक्सी परवाना चढवून कराच्या स्वरूपात शासनाच्या तिजोरीत येणारे अंदाजे 12 ते 14 कोटी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप संतोष हाडे यांनी केला आहे.