बुलडाणा -जमिनीच्या खटल्याची 'फी' माफ करतो म्हणत अकोल्याच्या एका वकिलाने बुलडाण्यातील शेगाव येथील महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून शेगाव पोलिसांनी अकोल्याच्या वकिलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
अकोल्याच्या पिसे नगर येथील वकील प्रविण महादेव तायडे यांच्याकडे जमिनीसंदभातील खटल्याचे प्रकरण पीडित महिलेने दिले होते. संबंधित जमिनीचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी वकील प्रविण महादेव तायडे हे पीडित महिलेसोबत विविध ठिकाणी जात होते. वकील व पीडित महिला हे 2016 पासून एकमेकांच्या संपर्कात होते. तर कामानिमित्त वकीलही पीडित महिलेच्या घरी जात होता.
दरम्यान, 2016 ते 2020 दरम्यान वकील प्रविण तायडे याने शेगांव येथील एका हॉटेलात पीडित महिलेला खटल्याबद्दल चर्चा करू, असे म्हणत बोलवले होते. त्यावेळी खटल्याची फी माफ करतो असे म्हणत पीडित महिलेवर बलात्कार केला. तसेच कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार पीडित महिलेने शेगाव शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.