बुलडाणा- तालुक्यातील अंभोडा येथील एका शेतकऱ्याकडे असलेल्या गाईला कृत्रिम रेतन (गर्भधारणा) करण्यासाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्का व्यतिरिक्त अधिकचे शुल्क वसूल केल्याचा व्हिडिओ संबंधित शेतकऱ्याने समोर आणला आहे. तर पशु वैद्यकीय हतेडी केंद्राला जोडलेल्या गावांतील शेतकऱ्यांकडून पशुधन पर्यवेक्षक हे अधिकचे शुल्क घेत असल्याचा आरोपही या शेतकऱ्याने केला आहे. डॉ. वसंत हांगे, असे त्या पशु वैद्यकीय हतेडी केंद्रातील पशुधन पर्यवेक्षकांचे नाव आहे. या व्हिडिओची सत्यता पडळातून व डॉ. हांगे यांची चौकशी करुन योग्य ती कारवाई करु, असे आश्वासन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दिवाकर काळे यांनी दिले आहे.
असा आहे प्रकार
अंभोडा येथील शेतकरी गुलाबराव पवार हे त्याच्या जवळील गाईचे कृत्रिम रेतन (गर्भधारणा) करण्यासाठी पशु वैद्यकीय हतेडी केंद्रात शनिवारी (31 जुलै) गेले होते. मात्र, केंद्रात पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे हे उपस्थित नव्हते. त्यांना फोनवर बोलल्यानंतर डॉ. वसंत हांगे हे अंभोडा येथे आले. गाईचे कृत्रिम रेतन केल्यानंतर शासनाकडून आकारण्यात येणाऱ्या 41 रुपयांच्या शुल्का व्यतिरिक्त 550 रुपयांची मागणी हांगे यांनी केली. त्यावरून गुलाबराव पवार ज्यांच्या जवळील 300 रुपये दिले व उरलेले 250 रुपये उधार ठेवले. मात्र, याबाबतचा व्हिडिओ शेतकऱ्यांनी तयार करून समाज माध्यमांसमोर आणला आहे. तर पशु वैद्यकीय हतेडी केंद्राला जोडलेल्या गावांतील शेतकऱ्यांकडून पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे हे अशाचप्रकारे अधिकचे शुल्क घेत असल्याचा आरोप शेतकरी गुलाबराव पवार यांनी केला आहे केला आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली दखल
पशु वैद्यकीय हतेडी केंद्राचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. वसंत हांगे यांच्या व्हिडिओची दखल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी घेतली आहे. त्यांनी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी दिवाकर काळे यांना त्यांनी चौकशीचे आदेश दिले असून काळे याबाबत चौकशी करत आहेत.