बुलडाणा- देशात कोरोनाविषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूला अटकाव करण्यासाठी आरोग्य कर्मचारी व सुरक्षा रक्षक जिवाचे राण करत आहे. नागरिकांकडूनही लॉकडाऊनचे पालन करून कोरोनाच्या लढाईला हातभार लावले जात आहे. नागरिकांच्या सहयोगाबरोबरच शासनाला आर्थिक सहायतेची देखील गरज आहे. हे समजून जिल्हा सामान्य रुग्णालयातील सफाईगार मोहम्मद अफसर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आपला एक महिन्याचा पगार दिला आहे.
सध्या आपल्या देशात कोरोनाचे संकट आहे. या विषाणूला रोखण्यासाठी देशातील नागरिक आपापल्या परीने योगदान देत आहेत. आतापर्यंत शासनाने मला संभाळले आहे. मुलांचे शिक्षण, लग्न हे सर्व नौकरीवरून झालेले आहे. मात्र, आता शासनाला माझी गरज आहे, त्यामुळे मी माझा एक महिन्याचा पगार जो २३ हजार रुपये इतका आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीला दान दिला आहे, अशी भावना मोहम्मद अफसर यांनी व्यक्त केली आहे.