बुलडाणा -बुलडाणा तालुक्यातील 600 लोकसंख्या असलेल्या उमाळा या गावात 90 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. अजूनही अनेकांचा स्वॅब अहवाल येणे बाकी आहे. कोरोनाने गावाची सर्व घडी विस्कटली असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.
माहिती देताना माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ हेही वाचा -'केंद्राने मंजूर केलेल्या ऑक्सिजन प्लांटमधून आठवडाभरात हवेतून ऑक्सिजनची निर्मिती होणार'
ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण सापडणारे गांव
बुलडाणा तालुक्यातील उमाळा हे 600 लोकसंख्येचे गाव आहे. सध्या या गावात कोरोना संसर्गाने कहर केला आहे. ग्रामीण भागात लोकसंख्येच्या तुलनेत सर्वाधिक रुग्ण सापडणारे बुलडाणा जिल्ह्यातील हे एकमेव गाव आहे.
उमाळा या गावातील अनेक कुटुंबातील सदस्यांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे होती. परंतु, कुणाचीही कोरोना तपासणी करण्यात आली नव्हती. स्थानिक रुग्णालयात जाऊन उपचार करून रुग्ण घरीच थांबत होते. दरम्यान, आरोग्य प्रशासनाने कोरोना चाचणीला सुरुवात केल्याने लोकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आरोग्य विभागाला परिस्थिती लक्षात आली. सध्या गावाच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच आयसोलेशन केंद्र तयार करण्यात आले असून, तेथेच रुग्नांवर उपचार सुरू आहेत. तर, गावातील पारावर मंदिर परिसरात कोरोना चाचणी कॅम्प लावण्यात आला आहे. आता सर्व नागरिकांची कोरोना चाचणी केल्या जात आहे. या गावाकडे बुलडाणा तहसीलदाराची नजर असून सर्व यंत्रणा कामाला लागली आहे. उमाळा या गावात कम्युनिटी स्प्रेड झाल्याने प्रशासनाने संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे.
आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे एवढे रुग्ण
गावातील तापाची साथ म्हणजे कोरोनाचा समूह संसर्ग असल्याचा प्राथमिक अंदाज आरोग्य विभागाला आला होता. मात्र, आरोग्य प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे गावात एवढे कोरोनाचे रुग्ण आढळल्याचा आरोप माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
हेही वाचा -बुलडाण्यात संसर्ग वाढल्याने जीवनावश्यक दुकानांच्या वेळेत बदल