बुलडाणा - जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे मागील चार महिन्यात नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी दोन व्यक्ती अंगावर वीज पडून तर सात जण हे नदीच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच नदीच्या प्रवाहात वाहून गेलेला एक जण अजून बेपत्ताच आहे.
जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर या वर्षी 1 जून ते 25 सप्टेंबर या चार महिन्यात मेहकर, खांमगाव, शेगांव, नांदुरा आणि संग्रामपूर तालुक्यातील 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यात मलकापूर तालुक्यातील जांभूळधाबा येथील अनंत वीरसेन पाटील यांचा 11 जून 2020 रोजी पुरात वाहून तर मेहकर तालुक्यातील पिंपळगाव उंडा येथील अनिरुद्ध रामराव काळे यांचा 1 जुलैला वीज पडून आणि शेगांव तालुक्यातील जवळा बु. येथील उस्मान उस्मान खा. सरदार खा. पठाण यांचा तसेच कालखेड येथील ज्ञानेश्वर अर्जुन गुरव यांचा 15 जुलैला पुरात वाहून मृत्यू झाला.
बुलडाण्यात गेल्या चार महिन्यात नैसर्गिक आपत्तीमुळे 9 जणांचा मृत्यू - natural calalmities death buldana
बुलडाणा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात नैसर्गिक आपत्तीमुळे 12 जणांचा मृत्यू झाला होता. तर मागील 4 महिन्यांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
संग्रामपूर तालुक्यातील एकलारा येथील रुखमाबाई सूर्यभान दातार यांचा वीज पडून 5 ऑगस्टला मृत्यू झाला आहे. शिवाय मेहकर तालुक्यातील देऊळगांव माळी येथील विजय पुरुषोत्तम सुरुशे यांचा, खांमगाव तालुक्यातील माक्ता येथील दिलीप ज्ञानदेव कळसकार आणि गजानन लहाणू रणशिंगे यांचा 21 सप्टेंबर रोजी पुरात वाहून मृत्यू झाला. यापैकी अनिरुद्ध, उस्मान खा, ज्ञानेश्वर, अनंत या मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. तर पाच जणांच्या मदतीचे प्रस्ताव शासनाकडे प्रस्तावित आहेत, अशी माहिती नायब तहसिलदार संजय बनगोळे (सामान्य प्रशासन विभाग) यांनी दिली. तर यासोबतच दुधाळ जनावरांसह इतर पशुधनांचेही नुकसान झाले आहे.