बुलडाणा- कोरोना संसर्गामुळे जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील प्रसिद्ध घटमांडणी होणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सारंगधर महाराज वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज पहाटे घट मांडणीचे भाकीत वर्तविले. राजा कायम राहील मात्र, रोगराईच्या संकटामुळे राजावर तणाव येईल, असे भाकीत या मांडणीतून वर्तवण्यात आले.
रोगराईच्या संकटामुळे राजावर येणार तणाव, भेंडवळच्या मांडणीचे भाकीत कोरोना संसर्गामुळे यावर्षी भेंडवळ घट मांडणी होणार नाही, असे जाहीर करण्यात आले होते. मात्र ही 350 वर्षाची परंपरा खंडीत होउ नये, यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सारंगधर महाराज यांना फोनद्वारे विनंती केली. त्यानुसार केवळ चंद्रभान महाराज यांच्या वंशजासह चार लोकांनी अक्षय्य तृतीयेला सायंकाळी भेंडवळ येथे घट मांडणी केली. आज सकाळी सूर्योदयापूर्वी त्या घट मांडणीचे निरीक्षण केल्या गेले. त्यानुसार यावर्षीचे भाकीत वर्तविल्या गेले अशी प्रतिक्रिया सारंगधर महाराज वाघ यांनी दिली.
भेंडवळ मांडणीला 350 वर्षाची परंपरा
बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जमोदच्या भेंडवळ येथे साडेतीनशे वर्षांपासून घटमांडणी केली जाते. चंद्रभान महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली होती. ती परंपरा आजपर्यंत सुरू आहे. शेतकरी वर्ग ही मांडणी ऐकण्यासाठी अक्षय्य तृतीयेला भेंडवळला येतात व भाकीत ऐकून त्यावरुन शेतकरी वर्षभरातील शेतीच नियोजन करतात.
अशी असते घटमांडणी
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेरील शेतात घटमांडणी करून त्यामध्ये १८ प्रकारचे धान्य ठेवण्यात येतात. मध्यभागी खोल खड्डा खोदून त्यामध्ये पाण्याने भरलेली घागर ठेवण्यात येते. काही खाद्यपदार्थही ठेवण्यात येतात. या घटांमध्ये रात्रभरात होणारे बदलाचे सूक्ष्म निरीक्षण करून दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयासमयी भविष्यवाणी केली जाते. या भविष्यवाणीमध्ये शेतीविषयक, राजकारण, नैसर्गिक भविष्यवाणी, पाऊस आणि पीकपाणी कसे राहील, याबाबत अंदाज वर्तविले जातात. मात्र यावर्षी देशावर असलेल्या कोरोना संकटामुळे जमावबंदी असल्याने रविवारी २६ एप्रिलच्या दिवशीची घटमांडणी रद्द करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे चंद्रभान महाराज वाघ यांचे वंशज सारंगधर महाराज वाघ यांनी सांगितले होते. मात्र शेतकऱ्यांच्या विनंतीवरून सारंगधर महाराज वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज सकाळी सूर्योदयासमयी घटमांडणीचे भाकीत वर्तविले.