बुलडाणा - जिल्हा रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी संदर्भातील वृत्त ईटीव्ही भारतने शनिवारी (ता. 30 मे) प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतली आहे. बुलडाणा सामान्य रुग्णालयातील शासकीय रक्तपेढी आता अद्यावत करण्यात येणार आहे. त्यासाठी 25 लाख रुपयांचा निधी नियोजन विभागामार्फत किंवा कोविड-19च्या निधीतून करण्यात देण्यात येणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सोमवारी ईटीव्ही भारतसोबत बोलताना दिली.
बुलडाणा जिल्ह्यातील रक्तपेढीसाठी निधी देणार असल्याची मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेंची माहिती.... हेही वाचा...अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रक्तपेढ्या मोजताहेत शेवटच्या घटका
कोरोना संकटकाळात रुग्णांना रक्ताची नितांत गरज भासणार आहे. याच पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी राज्यातील जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले होते. रक्तदान केल्यानंतर रक्त साठवण्यासाठी रक्तपेढी सुसज्ज असायला पाहिजे. मात्र, अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांच्याच जिल्ह्यातील रक्तपेढ्यांची दुरवस्था असल्याचे तपासणीत समोर आले होते. अन्न व औषध प्रशासन (एफडीए)च्या निकषानुसार जिल्ह्यात एकही सरकारी रक्तपेढी नाही. तसेच सर्व रक्तपेढ्या शेवटच्या घटका मोजताना दिसत असून जिल्ह्यात बुलडाणा, खामगाव आणि शेगाव अशा तीन सरकारी रक्तपेढ्या कार्यान्वित आहेत.
बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीमध्ये रक्ताच्या 400 बाटल्या ठेवण्याची क्षमता आहे. त्यासाठी रेफ्रिजरेटर, वातानुकूलित यंत्र या सर्व सोयी आवश्यक आहेत. मात्र, या रक्तपेढीमध्ये ६ रेफ्रिजरेटरपैकी दोन सुरू आहे. इतकेच नाही तर वातानुकूलित यंत्रासह सर्व यंत्र नादुरुस्त अवस्थेत बाहेर काढून ठेवली आहे. विजेच्या तारा बाहेर पडलेल्या असून एसी बंद अवस्थेत आहे. ही सर्व माहिती तपासणीदरम्यान पुढे आल्याचे वास्तव ईटीव्ही भारतचे समोर आणले होते. यावर बुलडाणा सामान्य रुग्णालयातील रक्तपेटीमध्ये नादुरुस्त असलेले रेफ्रीजरेटर,वातानुकूलित यंत्रासह आवश्यक असलेले यंत्र व रक्तपेढीमधील दुरुस्ती करिता 25 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली.