बुलढाणा : समृद्धी महामार्गावर अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनतोय की काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. समृद्धी महामार्गावर आज झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवान कार उलटल्यामुळे हा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कार औरंगाबादहून शेगावला जात होती. गाडीत एकूण 9 प्रवासी होते. मेहकरजवळ सिवनी पिसा गावाजवळ अर्टिका गाडीचा अपघात झाला.
महामार्गावर वाहनांचा सुसाट वेग :अपघातात 4 महिला आणि 2 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातात 6 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींवर मेहकर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. समृद्धी महामार्गावर वाहनांचा सुसाट वेग यामुळे अपघातांचा वेग सुद्धा सुसाट झाला आहे. आज सकाळी साडेसात ते आठ दरम्यान याच मार्गावर पुन्हा एकदा अपघात घडला आहे.
समृद्धी महामार्गावरचे अपघात : त्यामुळे या समृद्धी महामार्गावरचे अपघात केव्हा थांबणार? याला जबाबदार कोण? यावर नियंत्रण यायलाच हवे, अशा चर्चा अपघात झाल्यानंतर पुढे येतात. त्यानंतर त्यांचा वेग देखील मंदावतो, पण यावर कायमस्वरूपी तोडगा आणि तोही तात्काळ काढायला हवा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. नुकताच नवीन समृद्धी महामार्ग सुरू झाला आहे. रस्ते गुळगुळीत झाल्याने वेग देखील वाहनांचा नियंत्रणात राहत नाही. यात आज एका परिवार होत्याचे नव्हते झाले आहे, असाच एक काळाचा घाला एका परिवारावर आज झाला.
महामार्गावर अपघातांची मालिका : याआधी काही दिवसांपूर्वी दोन कारमध्ये बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील शिवनापिसा गावाजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. या अपघातात 2 जखमी तर 3 जण ठार झाले होते. समृद्धी महामार्गावरील मेहकर जालना रोडवर ही घटना 16 जानेवारी 2023 रोजी घडली होती. एका कारने दुसऱ्या कारला मागून धडक दिली होती. ही अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नाही.
हेही वाचा : Akola Crime : एक लाख रूपयांची लाच घेणाऱ्या आरपीएफ ठाणेदाराला सीबीआयने पकडले रंगेहात; पोलिस कोठडी