बुलडाणा: जिल्ह्यातील शेगाव शहरातील मटकरी गल्लीतील रहिवासी आनंद पालडीवाल यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कडी, कोंडा तोडून 15 जानेवारी व 16 जानेवारीच्या मध्यरात्री चोरांनी घरात प्रवेश करीत जवळपास एक कोटीची घरफोडी केली होती. त्यामध्ये तीन आरोपी त्यांच्याजवळ त्या दरोड्यातील 90 टक्के ऐवज पोलिसांनी हस्तगत करीत मोठे यश मिळवले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी आज पत्रकारांना माहिती देत अशा घटना टाळण्यासाठी आपल्या घराच्या कडी, कोंडे मजबूत लावून ठेवणे किंवा बाहेरगावी जाताना पोलीस ठाण्याला सूचना करणे तसेच घरात रोकड सोने-दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू ठेवणे टाळावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
11 आरोपींना आतापर्यंत अटक: या घरफोडीमध्ये 25 लाखांच्या रोख रकमेसह सोन्या-चांदीचे, हिऱ्याचे दागिने असा 92 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला होता. या गुन्ह्याची उकल करण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर होते. अखेर पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वात एलसीबीने चोरीचा छडा लावला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत 40 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात एलसीबी पथकाला यश आले असून एकूण 11 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
असा केला तपास: 15 जानेवारीला शेगाव येथील आनंद पाडलीवाल्यांच्या घरी झालेली ही चोरी जिल्ह्यातील आतापर्यंतची सर्वांत मोठी चोरी म्हटल्या जात आहे. चोरीचा तपास करण्याचे मोठे आवाहन जिल्हा पोलिसांसमोर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक, दोन अप्पर पोलीस अधीक्षक, खामगाव पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, शेगाव शहर पोलीस स्टेशन ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या मार्गदर्शनात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते. याशिवाय सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणासाठी सुद्धा सायबर शाखेचे पथक नेमण्यात आले. सायबर शाखेकडून मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे मेहकर तालुक्यातील सोनाटी येथील वैभव नंदू मानवतकर याला नाशिक येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यातून त्याच्या इतर दहा साथीदारांची नावे समोर आली.