भंडारा- कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी तुमसर तालुक्यातील सुकळी गावाच्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी पुढे आले आहेत. गावात रॅली काढून त्यांनी गावकऱ्यांकडून देणगी गोळा केली आहे. ही देणगी तहसीलदारांच्यामार्फत शासनाला पाठवली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे या स्तुत्य उपक्रमाला गावकऱ्यांनी सहकार्य करत शक्य तेवढी मदत देणगीच्या स्वरूपात केली आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तुमसरमधील विद्यार्थ्यांचा पुढाकार; रॅली काढून जमा केला निधी
पूरग्रस्त लोकांसाठी शासनाने आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. तसेच बऱ्याच सामाजिक संस्थांनीही शक्य तेवढी मदत पूरग्रस्तांना केली. शासकीय अधिकारी, कर्मचारी, खासगी क्षेत्रात काम करणारे लोक या सर्वांनीच आपल्यापरीने ही आर्थिक आणि इतर वस्तूंची मदत या पूरग्रस्तांना केली.
कोल्हापूर, सांगली या ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने भयानक पूर आला होता. आठ दिवसांनी पूर तर ओसरला मात्र या पुरामुळे हजारो घरे कोसळली आहेत. पुरात लोकांचे संसार उद्धवस्त झाले असून अनेक लोकांना बेघर व्हावे लागले आहे. आता या लोकांसमोर अनेक समस्या उद्भवत आहेत. या पूरग्रस्त लोकांना मदतीचा हात म्हणून राज्यभरातून मदत पोहोचवली जात आहे.
या पूरग्रस्तांना मदत म्हणून आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून भंडारा जिल्ह्यातील सुकळी/देव्हाडी या गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात रॅली काढत निधी गोळा केला. गावातील प्रत्येक घरातून ग्रामपंचायत, पान टपरी, शेतकरी, शिक्षक अशा प्रत्येक वर्गातून ही देणगी गोळा केली. देणगी स्वरूपात दहा हजार रुपये गावातून गोळा केले आहेत. हे पैसे तुमसर तहसीलदार यांच्यामार्फत पूरग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.