भंडारा- जिल्हा परिषदेतील 3 पदाच्या भरतीसाठी जिल्हा निवड समितीच्यावतीने घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. परीक्षा प्रक्रियेदरम्यान घोळ झाल्याचे निदर्शनास आल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे निवड समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, याप्रकरणी चार उमेदवार व परीक्षा घेणाऱ्या एजन्सीच्या चार कर्मचाऱ्यांविरुद्ध भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे एजन्सीला काळ्या यादीत टाकण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार उमेदवारांनाही पुढे होणाऱ्या परीक्षेसाठी अपात्र घोषित करण्यात आले आहे.
न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार भंडारा जिल्हा परिषदेतील अनुसूचित जमाती प्रवर्गातील तीन जागा भरण्यासाठी जिल्हा निवड समितीच्या माध्यमातून प्रक्रीया सुरू करण्यात आली. दोन अंगणवाडी सेविका आणि पाणी पुरवठा विभागात एक कनिष्ठ अभियंता अशा तीन जागांचा यात समावेश होता. ही संपूर्ण परीक्षेची प्रक्रिया एसएमबी प्रा.लि. नावाची कंपनी हाताळत होती. परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका मी स्वतः तयार केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अत्यंत गोपनीय पद्धतीने हे काम करण्यात आले. 200 गुणापैकी 150 च्या आसपास गुण घेवू शकतील, अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका तयार करण्यात आली होती.
गेल्या 12 जानेवारीला लेखी परीक्षा घेतली गेली. परीक्षेनंतर उत्तरपत्रिका प्रकाशित करून 13 जानेवारीपर्यंत हरकती मागविण्यात आल्या होत्या. अंगणवाडी सेविकेच्या प्रश्नपत्रिकेत असलेली दुरुस्ती एका उमेदवाराने लक्षात आणून दिल्यानंतर त्या प्रश्नासाठी पूर्ण गुण देण्याचाही निर्णय घेतले गेल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
14 जानेवारीला प्रत्यक्षात उत्तरपत्रिका तपासणीअंती अंगणवाडी सेविका पदासाठी पहिल्या क्रमांकाच्या उमेदवाराने 190, दुसऱ्या क्रमांकाचा उमेदवाराने 186 आणि तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराने 154 गुण घेतले. कनिष्ठ अभियंता पदासाठी पहिला उमेदवार 190, दुसरा 178 आणि तिसरा 142 गुणापर्यंत पोहोचला. या गुणांबाबत शंका आल्याने दोन्ही पदासाठी पहिल्या तीन क्रमांक पटकाविणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्ष बोलवून परीक्षेत दिलेल्या प्रश्नपत्रिकेवर आधारितच तोंडी उत्तरे विचारली गेली. मात्र, 190 गुण घेणारा उमेदवारही समाधानकारक उत्तरे देवू शकला नाही. 190 गुण घेतले असतानाही साधे इंग्रजी बोलता येत नसल्याने हा विषय गंभीर होता. याचवेळी ओएमआर पद्धतीने उत्तरपत्रिकेची तपासणी करत असल्याचे व्हिडिओ चित्रीकरण पाहिले असता त्यात कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून वेगळ्या उत्तरपत्रिका काही ठिकाणी टाकल्या जात असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. तसेच परीक्षा पर्यवेक्षकाच्या स्वाक्षऱ्यांमध्ये तफावत आढळून आली. या सगळ्या प्रकारामुळे परीक्षा प्रक्रीयेदरम्यान घोळ असल्याचे लक्षात येताच अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि कनिष्ठ अभियंता अशा दोन्ही पदासाठीच्या पहिल्या दोन क्रमांकावर असलेल्या उमेदवारांवर व एसएमबी कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांच्या अशा एकूण 8 जणांविरोधात भंडारा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.