भंडारा -रात्रीच्या वेळी घरातील सर्व जण झोपी गेले असताना, कडाक्याच्या थंडीत घराच्या गच्चीवर जाऊन मोबाईलवर बोलणे एका तरुणाला चांगलेच महाग पडले आहे. बोलत असताना अचानक चक्कर येऊन पडल्याने, एका 28 वर्षीय तरुणाचा कडाक्याच्या थंडीने मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे घडली आहे. अमोल राजू रहेले वय 28 वर्ष रा. लाखांदूर असे मृत तरुणाचे नाव आहे. 2020 साली थंडीमुळे झालेला हा जिल्ह्यातील पहिला मृत्यू आहे.
फोनवर बोलण्यासाठी तो नेहमीच गच्चीवर जात होता
मृत अमोल हा स्वतःची पान टपरी चालवायचा. तो रोज जेवण झाल्यानंतर मोबाईल वर बोलण्यासाठी गच्चीवर जायचा. घटनेच्या दिवशीही तो गच्चीवर गेला आहे, हे त्याच्या कुटुंबीयांना माहिती होते. मात्र नेहमीप्रमाणे तो फोनवर बोलणे झाल्यानंतर घरात परत येईल, याविचाराने सर्व जण निवांत झोपले होते. मात्र अमोलला चक्कर आल्याने, तो गच्चीवरच कोसळला आणि रात्रभर थंडीत पडून राहिल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. सकाळी उठल्यानंतर अमोल घरात न आढळून आल्याने, त्याच्या घरच्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. तो कुटुंबीयांना गच्चीवर मृतावस्थेत आढळून आला.
26 डिसेंबरला झाला मृत्यू
लाखांदूर येथे 26 डिसेंबरच्या मध्यरात्री ही घटना घडली. सुरुवातीला त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे समजले नव्हते. मात्र सोमवारी शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्याचा मृत्यू थंडीने झाल्याचे स्पष्ट झाले.