महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bhandara Year Ender 2021 : नवजात शिशु केअर सेंटरला आग, कोरोनाचा हाॅटस्पाॅट; लसीकरणात मात्र तिसरा - Bhandara 2021

जिल्हा सामान्य रुग्णालयात शिशु केअरला लागलेल्या आगीत अकरा बालकाच्या मृत्यू, कोरोनाचा हाॅटस्पाॅट, नाना पटोलेंची प्रदेशाध्यक्ष पदी झालेली निवड अशा घटनांनी भंडारा वर्षभर गाजत राहिले. अनेकदा निर्माण झालेली तणावाची परिस्थिती असो किंवा जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका पोलीस आणि प्रशासनाने त्यांची जबाबदारी गांभीर्याने हाताळली आहे. वर्षभराच्या घडामोडींचा हा लेखाजोखा.

Bhandara year under
भंडारा जिल्हा

By

Published : Dec 25, 2021, 4:05 PM IST

Updated : Dec 28, 2021, 8:57 AM IST

भंडारा:मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे हे 8 जानेवारी 2021 ला पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यातील महत्त्वकांक्षी गोसे प्रकल्पाला भेट देण्यासाठी आले. खुद्द मुख्यमंत्र्यांनी धरणाची पाहणी केल्यामुळे हा धरण लवकर पूर्णत्वास जाईल, तसेच जिल्ह्यातील इतरही रखडलेले लहान-मोठे धरण पूर्णत्वास येतील अशी आशा निर्माण झाली.

  1. नऊ जानेवारी च्या मध्यरात्री जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात शिशु केअर सेंटरला लागलेल्या भीषण आगीत अकरा बालकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उमटले. घटनेनंतर मुख्यमंत्री पुन्हा आले. पाहणी केली आणि चौकशीचे आदेश दिले. घटनेनंतर सलग तीन ते चार दिवस वेगवेगळ्या मंत्र्यांनी तसेच राज्यपालांनीही रुग्णालयाला भेटी दिल्या. दरम्यान कार्यरत 3 नर्स पैकी एका नर्स ला निलंबित तर दोन नर्स ला बडतर्फ करण्यात आले. तर हलगर्जीपणाचा ठपका ठेवून शिशु तज्ञ डॉक्टरला बडतर्फ करण्यात आले तर जिल्हा शल्य चिकित्सक व निवासी डॉक्टर यांना निलंबित करून त्यांची बदली करण्यात आली.
  2. फेब्रुवारी महिना हा राजकीय दृष्ट्या भंडारा जिल्ह्या साठी एक वेगळी आणि मोठी बातमी घेऊन आला. इतिहासात पहिल्यांदाच जिल्ह्यातील व्यक्तीला काँग्रेस सारख्या मोठ्या राजकीय पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पद मिळाले. नाना पटोले यांचा 12 फेब्रुवारी 2021 ला महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदग्रहण समारोह पार पडला. एरवी राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व नसलेल्या भंडारा जिल्ह्याला पटोले यांच्यामुळे नवी ओळख मिळाली.
  3. मार्च आणि एप्रिल महिन्यात भंडारा जिल्ह्यात कोरोनाने कहर केला. राज्यात सर्वाधिक हॉटस्पॉट असलेल्या दहा जिल्ह्यांत भंडारा होता. एकाच दिवसात दीड हजारांपेक्षा जास्त कोरोना बाधित रुग्ण सापडत होते, तर एकाच दिवशी 40 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याने प्रशासकीय आणि आरोग्य यंत्रणा हादरून गेली होती. मात्र जिल्हाधिकारी यांच्या चमूने आरोग्य यंत्रणेसोबत नियोजन करून रुग्ण संख्येवर हळू हळू नियंत्रण मिळवीत महाराष्ट्रातील पहिला शून्य कोरोना बाधित जिल्हा बनविला.24 डिसेंबर 2021 पर्यंत भंडारा जिल्ह्यात एकूण 60,109 लोक कोरोना बाधित होते या पैकी 58, 974 लोक बरे झाले असून 1134 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
  4. शेतकऱ्यांना मिळणाऱ्या धानाच्या बोनसचा विषय मोठ्या प्रमाणात गाजला. 2020- 2021मध्ये खरेदी केलेल्या खरीप पिकाचा बोनस हा जून माहीन्या पर्यंत मिळालाच नाही. त्यातच बोनसची रक्कम मिळवून देण्याचे श्रेय घेण्याचे प्रकार झाले पण शेतकऱ्यांना बोनस काही मिळाला नाही. त्यामुळे जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश असतानाही भाजपातर्फे जिल्हा पणन अधिकारी कार्यालयासमोर भाजपातर्फे मोठे आंदोलन करण्यात आले. एरव्ही जमावबंदीचे आदेश मोडण्यावर कार्यवाही केली जात होती मात्र भाजपा तर्फे केलेल्या या आंदोलनाची कुठलीही परवानगी नसताना आणि जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविली असताना आंदोलकांवर कुठलीही कारवाही झाली नाही.
  5. महत्वकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाची पाणी पातळी पहिल्यांदाच गाठण्याचा निर्णय झाला. 1980 मध्ये भूमिपूजन झालेले हे धरण 36 वर्षात पहिल्यांदाच पूर्णत्वास आले. 245.500 मीटर ची पाणी पातळी गाठण्याचे लक्ष ठरविल्यानंतर नोव्हेंबर महिन्यापासून धरणात पाण्याची साठवणूक सुरू करण्यात आली. डिसेंबर अखेरपर्यंत ही पातळी गाठली जाणार आहे. एकदा ही पातळी गाठल्यानंतर नेमका कोणकोणत्या भागात नव्याने पाणी गेले याची पाहणी केली जाणार असून त्यानुसार नव्या बाधितांना मोबदला दिला जाणार आहे.
  6. भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील राहणारा आकाश नथू पिकलमुंडे या पंचवीस वर्षीय तरुणाने भंडारा जिल्ह्याचे नाव देश पातळीवर नेऊन ठेवले आहे. आयपीएल नंतर सर्वाधिक प्रसिद्धी मिळालेल्या प्रो- कबड्डी स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. तब्बल 17 लाखाची बोली लावून त्याची संघात निवड करण्यात आली. 'सी' वर्गवारीत मोडत असलेल्या आकाश ची बेसिक बोली ही दहा लाखाची होती त्यापेक्षा सात लाख रुपये अधिक देऊन बंगाल वॉरियर ने त्याची निवड केली. प्रो कबड्डी स्पर्धेसाठी एखाद्या संघात बोली लागलेला आकाश हा भंडारा जिल्ह्यातील पहिला खेळाडू आहे.
  7. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ओबीसीचे राजकीय आरक्षण रद्द झाले आणि त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच भंडारा जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दोन टप्प्यात निवडणुका घेण्यात येत आहेत. ओबीसी चे राजकीय आरक्षण रद्द होण्याअगोदर भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्या होत्या. एससी, एसटी, सर्वसाधारण आणि ओबीसी यांचे आरक्षण ठेवले होते आरक्षणानुसार उमेदवार आणि त्यांचे नामांकन अर्ज दाखल केले. मात्र त्याच दरम्यान ओबीसीचे आरक्षण रद्द झाले त्यामुळे उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला. शेवटी राज्य निवडणूक आयोगाने रद्द झालेल्या ओबीसींच्या जागेवर सर्वसाधारण गटातून दुसऱ्या टप्प्यात निवडणूक घेतली जाईल असे घोषित केले. त्यामुळे पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुका या दोन टप्प्यात पार पडत आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणूक 21 डिसेंबरला झाली आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक ही 18 जानेवारीला होणार आहे.
  8. कोरोना पासून बचाव करायचा असल्यास जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण होणे गरजेचे असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये लसीकरणाला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली जिल्हाधिकारी यांनी नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण मोहीम हातात घेऊन संपूर्ण जिल्ह्यात लसीकरणासाठी कॅम्प घेतले आणि त्याची फलश्रुती म्हणजे लसीकरणाच्या बाबतीत भंडारा जिल्हा हा राज्यात तिसरा क्रमांक वर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 95. 55 टक्के लोकांनी पहिला डोस घेतलेला आहे तर 71 टक्के लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतलेला आहे. जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी "मिशन लेस्ट आऊट" या अंतर्गत 24 ते 31 डिसेंबर दरम्यान विशेष लसीकरण मोहीम घोषित केली आहे.
  9. जिल्हा सामान्य रुग्णालय मध्ये अकरा बालकाच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती असो किंवा नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्या टप्प्यातील निवडणुका असो पोलीस प्रशासनाने त्यांची जबाबदारी अतिशय गांभीर्याने आणि सुव्यवस्थित पार पडलेली आहे. कोरोना काळात रोजगार गेल्यामुळे घरी असलेल्या लोकांची संख्या वाढलेली आहे त्यामुळे जिल्ह्यात किरकोळ घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारतीय दंड संहिता वगळता विविध कायद्याने वर्षभरात 1958 गुन्हे दाखल झाले असून 1953 गुन्हे उघड झाले आहेत. तर भादवि अंतर्गत एकूण 2515 गुन्हे दाखल झाले असून 2092 गुन्हे उघड झाले आहेत. या गुन्ह्यांमध्ये खून,खुनाचा प्रयत्न , सदोष मनुष्यवध, चोरी, बळजबरी, विनयभंग यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच 2021 मध्ये ऑनलाइन फ्रॉड चे 44 गुन्हे दाखल झाले, या पैकी 17 गुन्हे उघड झाले आहेत. इतर जिल्ह्यातून येणारे गुन्हेगार, अवैध वाहतूक यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या नऊ सीमेवर सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
Last Updated : Dec 28, 2021, 8:57 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details