भंडारा - वेल्डिंग हा तसा पुरुषांचे वर्चस्व असणारा व्यवसाय आहे. मात्र, याला तडा दिला आहे, जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील कोमला अरोरा या महिलेने. कोणतेही कौशल्याचे शिक्षण न घेता केवळ जिद्दीच्या जोरावर कोमल यांनी 'गणराया फॅब्रिकेशन' या व्यवसायाच्या माध्यमातून वार्षिक कोट्यवधींची उलाढाल केली आहे.
कोमल अरोरा असे या महिलेचे नाव आहे. नाव जरी कोमल असले तरी त्यांनी निवडलेले कार्य अवघड आहे. भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील विरली गावात 'गणराया फॅब्रिकेशन' या व्यवसायाच्या त्या मालकीन आहेत. वेल्डींगच्या व्यवसायात पुरुषांचे वर्चस्व जास्त आहे. मात्र, कोमल यांनी हा व्यवसाय यशस्वी करुन दाखवला आहे.
कोमल यांनी कुठलेही व्यवसायीक शिक्षण घेतलेले नाही. लग्नानंतर आर्थिक परिस्थिती बरी नसल्याने आसगावतील एका फॅब्रिकेशन कारखान्यात लेखापरीक्षकाचे काम सुरू केले होते. कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची इच्छा असल्याने फावल्या वेळेत त्यांनी वेल्डिंगचे काम शिकण्यास सुरुवात केली. लेखापरीक्षक म्हणून मिळणारे तीन हजार रुपये कुटुंब चालविण्यासाठी अपुरे पडत होते. त्यामुळे त्यांनी स्वतः चा व्यवसाय सुरू करण्याचे ठरविले. त्याच कारखान्यातील दोन सहकाऱ्यांना हाताशी घेऊन प्रायोगिक तत्वावर पहिली ट्रॉली बनविली आणि तिच्या विक्रीनंतर या व्यवसायाला मोठ्या प्रमाणात सुरुवात करण्याचे ठरविले.