भंडारा- रस्ते निर्मिती करणाऱ्या गोवार कंपनीने मुरुमसाठी भंडारा तालुक्यातील दवडीपार येथील महिला शेतकऱयांची शेती खोदून मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. शेतीला पूर्वरूप मिळावे या मागणीसाठी महिला शेतकरी शेतात उपोषणाला बसली होती. 'ई टीव्ही भारत'ने ही बातमी दाखवल्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात खळबळ निर्माण झाली होती. बातमीची दखल घेत तीन दिवसातच या महिलेला तीन वर्षाचा मोबदला देऊन शेती पूर्वीप्रमाणे करून देण्याचे आश्वासन कंपनीने दिले आहे. मोबदला मिळाल्यानंतर या महिलेने 'ई टीव्ही भारत'चे आभार मानले आहे.
दवडीपार येथील अल्पभूधारक महिला शेतकरी ताराबाई मेश्राम यांच्या तीन एकर शेतीमध्ये 'गोवर कंपनी'ने रस्ते निर्मितीसाठी लागणाऱ्या मुरमासाठी उत्खनन केले होते. शेतकर्याची कोणतीही परवानगी न घेता तहसीलदारांनी या कंपनीला पाचशे- पाचशे ब्रासचे दोन परवाने दिले होते. मुळात तहसीलदारांना 500 ब्रासपेक्षा जास्त उत्खनन करण्याचे आदेश देता येत नाहीत. तहसीलदार यांनी हजार ब्रास मुरमाच्या उत्खननाची परवानगी दिल्यानंतर गोवर कंपनीने 7 हजार ब्रास मुरुमाची उत्खनन केले. याची तक्रार ताराबाई मेश्राम यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलीस अधिकारी यांना दिली. मात्र, कोणीही दखल न घेतल्यामुळे त्यांनी त्यांच्या शेतात सोमवारपासून उपोषणाला सुरुवात केली होती.
'ई टीव्ही भारत'ने सोमवारी ही बातमी प्रकाशित केली होती. त्यात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना ही विचारणा करण्यात आली असता, त्यांनी लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. एकंदरीतच या बातमीनंतर राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात खळबळ उडाली आणि केवळ तीन दिवसात चौकशी करून या महिलेला साडेतीन लाख रुपये रोख रक्कम कंपनीने दिली, तर शेतात माती आणि शेणखत घालून देण्याचे लेखी आश्वासन दिले.