भंडारा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरुद्ध काँग्रेस अध्यक्ष यांना पत्र लिहून बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोले यांच्या कामाच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. स्वतःचे प्रदेशाध्यक्षपद वाचवण्यासाठी नाना पटोले दिल्लीला जात असल्याची चर्चा सुरु आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. मी, उद्या दिल्लीला नाही तर, पुण्याला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. माझे पूर्ण लक्ष पुण्यातील निवडणुकीवर आहे. त्यामुळे दिल्लीला जाण्याचा प्रश्नच नाही असे, देखील नाना पटोले म्हणाले. ते आज भंडारा येथे पत्रकांराशी संवाद साधत होते.
तांबेच्या राजकारणाकडे लक्ष नाही :काँग्रेसमध्ये बंडखोरीमुळे गृह युद्ध बघायला मिळत आहे. सत्यजित तांबे यांच्याविषयी नाना पटोले यांना विचारले तर ते म्हणाले या प्रकारच्या राजकारणाकडे मी लक्ष देत नाही. कोणी काय बोलावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. आज काँग्रेस महाराष्ट्रात अदानी विरुद्ध लढते आहे. त्यावर जास्त आमचे लक्ष आहे. आम्ही लोकांच्या आर्थिक, सामाजिक प्रश्नाविषयी, रोजगार प्रश्नावर लढा उभारला आहे. त्यामुळे कोण काय राजकारण करते याकडे मी फारसे लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
कसब्यात बंडखोरी : कसब्यामध्ये बंडखोरी होणार असल्याची चर्चा आहे, याविषयी नाना पटोले यांना विचारले असता ह्या सर्व माध्यमांच्या बातम्या आहेत. शिक्षक मतदार संघातही अशाच बातम्या आल्या होत्या. मात्र, आम्ही जिंकलो, महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीविरुद्ध बातम्याने काही फरक पडणार नाही. अजुन विड्रॉलला वेळ आहे. कसबा हा संताचा, क्रांतिकारी विरांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे आता समाज विरोधी भाजपा सरकारला हरविण्यासाठी महाविकास आघाडीने रणनीती बनवली असून कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार नक्की जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.