भंडारा - जिल्ह्यातील तुमसर ते तिरोडा मार्गावर देव्हाडी येथे सुरू असलेल्या उड्डान पुलाचे काम मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. या पुलामध्ये भर घालण्यासाठी मध्यभागी राखेचा वापर केला आहे. मात्र, आता पावसामुळे ही राख वाहून जात असल्याने पुलावर 5 ते 10 फुटांचे खोल खड्डे सतत पडत आहेत. अद्याप या पुलावरून वाहतूक सुरू झालेली नाही, तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्डे पडत आहेत. वाहतूक सुरू झाल्यास इथे मोठी घटना होण्याची शक्यता आहे. म्हणून योग्य पद्धतीने पुलाचे काम करावे तसेच कंत्राटदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा -सदाभाऊ खोतांची महायुतीकडे 12 जागांची मागणी; 'हे' आहेत मतदारसंघ
जिल्ह्यातून गेलेल्या मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरून दररोज शंभरच्यावर रेल्वे गाड्या या मार्गावरून जात असतात. त्यामुळे तुमसर ते गोंदिया या महामार्गावर वाहतुकीस मोठ्या अडचणी निर्माण होत असे, त्यामुळे लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. यासाठी या ठिकाणी 40 कोटी रुपये खर्च करून उड्डान पूल बनविण्यात येत आहे. मागील पाच वर्षांपासून या पुलाचे काम सुरू आहे. मात्र, या उड्डान पुलामध्ये अदानी पावर प्लांटची राख टाकण्यात आली आहे. पावसाळा लागताच पुलाच्या दगडांच्या गॅपमधून राख वाहून जात असल्याने पूलामध्ये पोकळी निर्माण झाली आणि त्यामुळे पुलावर 10 फुटापर्यंत खड्डे पडणे सुरू आहे. खड्डा पडला की त्यामध्ये सिमेंट काँक्रीट भरून खड्डे बुजविण्याचे प्रकार आता नेहमीच पाहायला मिळत आहे.