भंडारा- शहरातील वैशालीनगरमध्ये मागील ९ दिवसांपासून पाणी येत नसल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. शहरात पाणी टंचाई आहे. खासगी बोअरवेलही आटले आहेत. त्यात नगर पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे वैशाली नगरातील लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, प्रशासन या समस्येवर काहीही बोलण्यास तयार नाही.
या परिसरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन खोदून ठेवल्याने पाण्याची समस्या उद्भवली आहे. नव्याने बसवलेल्या पाईपलाईनला जुनी पाईपलाईन जोडायची असल्याने ती खोदून ठेवली आहे. मात्र, पाईपलाईन जोडली नसल्याने मागील ९ दिवसांपासून नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याविषयी नगर परिषद अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही.