भंडारा- मागील १० दिवसांपासून भंडारा जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात पाणी पुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांची भटकंती सुरू आहे. पाणी आले आणि पाण्यानेच पाणी हिरावून घेतले अशी अवस्था जिल्हा वासियांची झाली आहे. शक्य आहे त्यांनी पैसे खर्च करून तहान भागवली. परंतु, जे आर्थिक विवंचनेत आहेत त्यांचे काय? पाण्याशिवाय होणारे हाल काय असतात याचा प्रत्यय जिल्ह्यात आलेल्या पुराने दिला आहे.
ऑगस्ट महिन्याच्या शेवटी भंडारा जिल्ह्यात भीषण पूरपरिस्थिती उद्भवली होती. यापूर्वीही जिल्ह्यातील लोकांनी पूर बघितले होते, मात्र या वेळेची परिस्थिती वेगळीच होती. या वेळी ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागालाही पुराने आपल्या कवेत घेतले. या परिस्थितीचा कधी स्वपनातही विचार न केलेल्या लोकांना विस्थापित होऊन शाळांमध्ये आसरा घ्यावा लागला. पुराचे संकट ३ दिवसानंतर ओसरले, मात्र विस्कळीत झालेल्या जल पुरवठा यंत्रणेमुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
पुरामुळे भंडारा शहराला पाणीपुरवठा करणारे जलशुद्धीकरण केंद्रे, विहिरी पाण्याखाली गेले आहेत. केंद्रात गाळ साचल्याने सर्व यंत्रणा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे २८ तारखेपासून बंद झालेला शहराचा पाणीपुरवठा आजही बंद आहे. यापूर्वी तीन चार दिवस ही परिस्थिती राहायची. मात्र यावेळी पुराच्या रौद्र रुपाने हा कालावधी वाढला आहे. अजूनही नगरपालिका प्रशासनाकडून यंत्रणा पूर्ववत करण्याची कसरत सुरू आहे. मात्र, दुसरीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दारोदारी भटकावे लागत आहे.