भंडारा- गेल्या काही दिवसांपासून ओढ दिलेल्या पावसाने रविवारी सकाळी दमदार हजेरी लावली. या पावसामुळे रोवणीच्या कामाला आता वेग येणार असून शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील गोसे खुर्द धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाचे 11 दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत.
महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरू असला तरी भंडारा जिल्ह्यात मागच्या वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती. त्यामुळे भात लागणीची कामे खोळंबली होती, परिणामी शेतकरी वर्गातून चिंताक्रांत होता. मात्र आज सकाळपासूनच वरुणराजाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे खोळंबलेली भात लागणीच्या कामाला वेग आला आहे. तर काही ठिकाणी झालेल्या लागणीची पिकाला पाण्याची गरज होती ती या पावसाने पूर्ण झाली आहे.