भंडारा - भंडारा नगरपालिकेचे नालेसफाईचे पितळ मुसळधार पावसात उघडे पडले आहे. रात्री झालेल्या पावसामुळे शहराच्या बऱ्याच भागात पाणी साचले आहे. बैरागी वार्डात २० लोकांच्या घरात पाणी शिरल्याने या लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून रात्र जागून काढावी लागली आहे. भंडारा नगरपालिकेने यावर्षी शहरातील नालेसफाई पूर्ण केली नसल्याने त्याचा फटका आता नागरिकांना सहन करावा लागत आहे.
मागील चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात पाऊस पडत आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने शहरातील नाल्याच्या शेजारी आणि सखल भागात पाणी शिरले. शहरातील मोठ्या नाल्याशेजारी असलेल्या बैरागी वाड्यातही पाणी शिरले, यापैकी २० घरात पाणी शिरल्याने लोकांची चांगलीच तारांबर उडाली. घराच्या आत जवळपास २ फुटापर्यंत पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य भिजले. साठवून ठेवलेले कांदे सर्वत्र पसरले. पाण्यामुळे फ्रीज खराब झाला तसेच इतरही बऱ्याच गोष्टींचे नुकसान झाले असून घराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते.